मुंबई, 16 सप्टेंबर (हिं.स.)। राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पुढील व्यवस्था होईपर्यंत त्यांनी कामकाज सुरू ठेवावे, अशी विनंती राज्य सरकारने केली असून सराफ यांनी ती मान्य केली आहे. जानेवारीपर्यंत ते पदाचा कार्यभार सांभाळतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (१६ सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिली.
बीरेंद्र सराफ हे गेल्या काही वर्षांपासून राज्याचे महाधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तब्बल २५ वर्षे बॉम्बे उच्च न्यायालयात वकिली केली आहे. गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, मुंबई येथून त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. सुरुवातीला ते भारताचे विद्यमान सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या कक्षात ज्युनियर वकील म्हणून काम करत होते. २००० मध्ये चंद्रचूड यांची बॉम्बे हायकोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सराफ यांनी माजी महाधिवक्ता रवी कदम यांच्या चेंबरमध्ये वकिली सुरू ठेवली.
सन २०२० मध्ये त्यांची वरिष्ठ वकिल म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी सहा वर्षे बॉम्बे बार असोसिएशनचे सचिव म्हणून काम पाहिले. सराफ यांनी अनेक महत्त्वाच्या आणि वादग्रस्त प्रकरणांत युक्तिवाद केला आहे. सप्टेंबर २०२० मध्ये बीएमसीने बांद्रा येथील अभिनेत्री कंगना रणौत यांच्या कार्यालयावर केलेल्या पाडकामाविरोधात दाखल याचिकेत त्यांनी रणौत यांची बाजू यशस्वीरीत्या मांडली होती. उच्च न्यायालयाने त्या पाडकामाविरोधातील नोटीस रद्द केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule