मुंबई, 16 सप्टेंबर (हिं.स.) आयसीसीने आशिया कपमधून मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना काढून टाकण्याची पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली आहे. जर पायक्रॉफ्ट यांना काढून टाकले नाही तर ते स्पर्धेतून माघार घेतील अशी धमकी पाकिस्तानने दिली होती. आयसीसीने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पीसीबीला आपला निर्णय कळवला आहे. पीसीबी संचालकांसह आशियाई क्रिकेट परिषदेच्या काही अधिकाऱ्यांना आधीच माहित होते की, दोन्ही कर्णधारांमध्ये हस्तांदोलन होण्याची शक्यता नाही.
आता पाकिस्तान बोर्ड काय भूमिका घेते हे पाहणे खूप मनोरंजक असेल. दरम्यान, जर पायक्रॉफ्ट यांना काढून टाकले नाही तर पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली होती. ज्या अंतर्गत पीसीबीने भारतीय क्रिकेटपटू आणि मॅच रेफरी पायक्रॉफ्ट यांच्याविरुद्ध औपचारिक निषेध नोंदवला होता.
पीसीबीने आपल्या पत्रात म्हटले होते की, पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तानी कर्णधार सलमान आगाला सूर्यकुमार यादवशी हस्तांदोलन न करण्याचा सल्ला दिला होता. बोर्डाने म्हटले होते की, भारतीय क्रिकेटपचू विरोधी संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार देऊन आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत. ६९ वर्षीय झिम्बाब्वेचे अँडी पायक्रॉफ्ट संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध होणाऱ्या पाकिस्तानच्या शेवटच्या गट फेरीच्या सामन्यात मॅच रेफ्रीची भूमिका बजावणार आहेत.
१७ सप्टेंबर रोजी पाकिस्तान शेवटच्या साखळी सामन्यात यूएईविरुद्ध खेळेल. ओमानला हरवून यूएईने आपले स्थान मजबूत केले आहे. आता १७ सप्टेंबर रोजी होणारा सामना पाकिस्तानसाठी करा किंवा मरो असा आहे. सुपर ४ मध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत यूएईचा पराभव करावा लागेल. जर पाकिस्तानने आशिया कपमध्ये यूएईविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला तर यूएईला वॉकओव्हर मिळेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे