नवी दिल्ली, 16 सप्टेंबर (हिं.स.) ड्रीम-११ मधून बाहेर पडल्यानंतर बीसीसीआयला नवीन मुख्य प्रायोजक मिळल्याची चर्चा आहे. अपोलो टायर्स भारतीय क्रिकेट संघाचा नवा प्रायोजक बनण्याची चर्चा आहे. अपोलो टायर्सचा २०२७ पर्यंत बीसीसीआयशी करार असल्याची माहिती आहे. या नवीन करारानुसार अपोलो टायर्स बीसीसीआयला प्रति सामना ४.५ कोटी रुपये देऊ शकते.जे ड्रीम-११ च्या पूर्वीच्या ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
कॅनव्हा आणि जेके टायर या बोली लावणाऱ्या इतर दोन कंपन्या होत्या. याशिवाय, बिर्ला ऑप्टस पेंट्स गुंतवणूक करण्यास उत्सुक दिसत होते. पण बोली प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छित नव्हते.
२ सप्टेंबर रोजी बीसीसीआयने भारतीय संघाच्या मुख्य प्रायोजक हक्कांसाठी अर्ज मागवले आणि बोली प्रक्रिया मंगळवारी झाली. नियमांचे स्पष्टीकरण देताना, बीसीसीआयने म्हटले होते की गेमिंग, बेटिंग, क्रिप्टो आणि तंबाखू ब्रँडना बोली प्रक्रियेत भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. अशा परिस्थितीत येणाऱ्या काळात भारतीय जर्सीवर अपोलो टायर्स लिहिलेले दिसू शकते.
ही भागीदारी अपोलो टायर्सला जागतिक स्तरावर मोठी ओळख देऊ शकते, विशेषतः येणाऱ्या काळात भारताच्या व्यस्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रक लक्षात घेता. हा करार अलिकडच्या काळात भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या आणि सर्वात फायदेशीर प्रायोजकत्व करारांपैकी एक मानला जात आहे.
बीसीसीआय आणि अपोलो टायर्समधील करार अशा वेळी झाला आहे जेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ड्रीम११ सोबतचा करार संपवला होता. ड्रीम११ सोबतचा हा करार रद्द करण्यात आला कारण तो एक बेटिंगशी संबंधित ऍप आहे. ज्यावर अलीकडेच बंदी घालण्यात आली होती. भारतीय पुरुष क्रिकेट संघाने युएईमध्ये सुरू असलेल्या आशिया कपमध्ये कोणत्याही जर्सी प्रायोजकाशिवाय प्रवेश केला आहे, तर महिला संघ देखील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत कोणत्याही प्रायोजकाशिवाय खेळत आहे.
बीसीसीआय आणि फॅन्टसी स्पोर्ट्स कंपनी ड्रीम-११ यांच्यातील ३५८ कोटी रुपयांचा प्रायोजकत्व करार अकाली संपला होता. हा करार २०२३ मध्ये तीन वर्षांसाठी होता. पण अलीकडेच मंजूर झालेल्या 'ऑनलाइन गेमिंग बिल २०२५' मुळे, ड्रीम११ ने करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. २०२३ मध्ये ड्रीम११ ने बायजूची जागा घेतली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे