बीजिंग, 16 सप्टेंबर (हिं.स.)भारताने पुन्हा एकदा क्रीडा जगात आपला ठसा उमटवला आहे. चीनमधील बेदाईहे येथे आयोजित स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारताच्या आनंद कुमार वेलकुमारने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. २२ वर्षीय आनंद कुमारने १:२४.९२४ मिनिटांच्या वेळेसह वरिष्ठ पुरुषांच्या १००० मीटर स्प्रिंट शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला आणि या स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
यापूर्वी याच चॅम्पियनशिपमध्ये त्याने ५०० मीटर स्प्रिंटमध्ये कांस्यपदक जिंकून भारताला पहिले वरिष्ठ जागतिक अजिंक्यपद पदक मिळवून दिले होते. त्याने ही शर्यत ४३.०७२ सेकंदात पूर्ण केली. या ऐतिहासिक कामगिरीवरून हे स्पष्ट झाले आहे की, आता भारत केवळ क्रिकेट किंवा बॅडमिंटनमध्येच नव्हे तर स्पीड स्केटिंगसारख्या आव्हानात्मक खेळांमध्येही जगातील एक मोठी शक्ती बनत आहे.इतकेच नाही तर भारतासाठी अभिमानाची ही बाब येथेच थांबली नाही. ज्युनियर गटात तरुण स्केटर क्रिश शर्माने १००० मीटर स्प्रिंटमध्ये सुवर्णपदक जिंकून स्केटिंगमध्ये भारताचे भविष्य खूप उज्ज्वल आहे हे सिद्ध केले.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी २०२५ च्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पहिल्या विजयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आनंद व्यक्त करताना त्यांनी लिहिले की, भारतीय खेळांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे! आनंद कुमार वेलकुमार यांनी २०२५ च्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये १००० मीटर स्प्रिंटमध्ये सुवर्णपदक जिंकले.
भारताच्या अशा ऐतिहासिक कामगिरीमुळे हे स्पष्ट झाले आहे की आता भारतीय खेळाडू जगातील कोणत्याही व्यासपीठावर मागे नाहीत. आनंद कुमारच्या या विजयाने येणाऱ्या पिढ्यांना केवळ प्रेरणाच दिली नाही तर हे देखील सांगितले आहे की जर स्वप्ने मोठी असतील आणि कठोर परिश्रम खरे असतील तर कोणतेही ध्येय दूर नाही. हा विजय फक्त एका खेळाडूचा नाही तर १३० कोटी भारतीयांचा आहे, असा क्षण आहे ज्याचा संपूर्ण देशाला अभिमान वाटू शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे