मुंबई, 16 सप्टेंबर (हिं.स.)। काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता सुधीर बाबू यांच्या ‘जटाधारा’ या चित्रपटाची घोषणा झाली होती. या घोषणेमुळेच सिनेमाप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून सोनाक्षी सिन्हा प्रथमच तेलुगू सिनेमात पदार्पण करीत आहे. त्यामुळे हिंदीसह साऊथ इंडस्ट्रीतील प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्साह आहे.
निर्मात्यांनी अखेर ‘जटाधारा’च्या रिलीज डेटची घोषणा केली असून, हा चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. रिलीज डेटसोबतच या चित्रपटाचा मोशन पोस्टरही लाँच करण्यात आला आहे. पोस्टरमध्ये चित्रपटाचा रहस्यमय आणि पौराणिक अंदाज दिसून येतो. निर्मात्यांनी पोस्टरसह लिहिलेलं वाक्य – “अंधकाराच्या गाभाऱ्यातूनच उगवते दिव्यता” – या टॅगलाईनमुळे प्रेक्षकांच्या उत्सुकतेत आणखी भर पडली आहे.
‘जटाधारा’चे दिग्दर्शन वेंकट कल्याण आणि अभिषेक जायसवाल यांनी केले आहे. सोनाक्षी सिन्हा आणि सुधीर बाबूसह या चित्रपटात दिव्या खोसला कुमार आणि शिल्पा शिरोडकर यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.
भव्य सेट्स, रहस्यमय कथा आणि पॅन-इंडिया रिलीजची तयारी यामुळे ‘जटाधारा’ हा वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपट ठरणार आहे. प्रेक्षक आता ७ नोव्हेंबरची आतुरतेने वाट पाहत आहेत, जेव्हा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊन आपली जादू दाखवेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर