लातूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात मित्र संस्थेचे उपाध्यक्ष तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात महास्ट्राईड उपक्रमाचा आढावा घेतला.तसेच जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढीसाठी कृषि, महिला बचतगट, सिंचन आदी क्षेत्राशी निगडीत नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी कृषि विभागाने पीक पद्धती, कृषि आधारित प्रक्रिया उद्योग, जिल्ह्यातील प्रमुख पिकांची निर्यात आदी बाबतीत नाविन्यपूर्ण संकल्पना सादर कराव्यात. जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन सोबतच तूर आणि इतर पिकांचा यामध्ये समावेश करावा. महिला बचतगटांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही आमदार श्री. पाटील म्हणाले. तसेच जिल्ह्यातील युवकांना महाराष्ट्र स्कील युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने प्रशिक्षण देण्यासाठी आयटीआयने पुढाकार घ्यावा. या माध्यमातून युवकांना विविध उद्योगांमध्ये थेट नोकरीची संधी मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले. पर्यटन, वन, आरोग्य सुविधा, सिंचन, उद्योग आदी बाबींवरही यावेळी चर्चा करण्यात आली.
अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, जिल्हा कोषागार अधिकारी उज्ज्वला पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, जावेद शेख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis