रायगड, 17 सप्टेंबर, (हिं.स.)। ग्रामपातळीवर शाश्वत विकास साधण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा रायगड जिल्ह्यातील शुभारंभ आज महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते पळस्पे (पनवेल) येथे ग्रामपंचायतीत दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
कु. आदिती तटकरे यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत अभियानाचे महत्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यभरात हे अभियान राबविले जाणार असून, सुशासनयुक्त, सक्षम, स्वच्छ, हरित आणि जलसमृद्ध गावांची निर्मिती, शासन योजनांचा प्रभावी अंमल, लोकसहभाग वाढविणे, तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना उत्कृष्ट कामगिरीसाठी बक्षिसांची संधी दिली जाणार आहे.
प्रथम क्रमांक – १५ लाख रुपये
द्वितीय क्रमांक – १२ लाख रुपये
तृतीय क्रमांक – ८ लाख रुपये
तसेच विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावरही स्वतंत्र बक्षिसांची तरतूद आहे. मंत्री तटकरे म्हणाल्या, “पळस्पे ग्रामपंचायतीने राज्यातील पहिल्या पाच ग्रामपंचायतींमध्ये स्थान मिळवावे, अशी माझी अपेक्षा आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या या ग्रामपंचायतीत अनेक विकास प्रकल्प साकारले जाऊ शकतात. गटविकास अधिकाऱ्यांनी यासाठी विशेष प्रयत्न करावेत.”
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथून राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला, तो दूरदृश्यप्रणालीद्वारे पळस्पे ग्रामपंचायतीत दाखवण्यात आला. कार्यक्रमानंतर कु. तटकरे यांनी महिला बचत गटांनी लावलेल्या विविध उपक्रमांच्या स्टॉल्सला भेट देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. राज्यातील किमान तीन ग्रामपंचायतींनी रायगड जिल्ह्यातून राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करावा, अशी अपेक्षा मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, गटविकास अधिकारी समीर वाठारकर, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, महिला बचत गटाच्या सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके