नांदेड, 17 सप्टेंबर, (हिं.स.)। राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत “सेवा पंधरवडा” चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरील या कार्यक्रमाचा शुभारंभ राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते येथील जिल्हा नियोजन भवन येथे आज संपन्न झाला.
यावेळी राज्यसभा सदस्य तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
या सेवा पंधरवड्यात राबविण्यात येणारे विविध उपक्रम हे मोहिम स्वरुपात राबविण्यात येणार आहेत. या कालावधीत सामान्य नागरिकांसाठी शासनाच्या विविध सेवा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून तीन टप्यात साजरा करण्यात येत आहे. पहिला टप्पा 17 ते 22 सप्टेंबर, दुसरा टप्पा 23 ते 27 सप्टेंबर तर तिसरा टप्पा 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा कालावधीत राहणार आहे. पहिल्या टप्यात रस्ते सर्वेक्षण, दुसऱ्या टप्यात अतिक्रमणे नियमित करणे तर तिसऱ्या टप्यात नाविन्यपूर्ण उपक्रमात गाव तिथे दफन भूमी, गायरान जमिनीची जिओ फेन्सिंग लॅण्ड बँक तयार करणे, व्हॉटसॲपद्वारे तक्रार संकलन व निवारण करण्यात येणार आहे.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांच्या सोयीसाठी व्हॉटसॲप चॅटबॉट ॲटोमेशन (WhatsApp Chatbot Automation) सेवा सुरू केली आहे. या सेवेचे उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज नियोजन भवन येथे करण्यात आले. या सेवेमुळे नागरिकांना शासकीय माहिती व सेवा सहज, सोप्या आणि वेगवान पद्धतीने उपलब्ध होत आहेत. चॅटबॉट Chatbot च्या मदतीने नागरिक 24 तास कोणत्याही वेळी कार्यालयीन कामकाजाबाबतची माहिती मिळवू शकतात. शासकीय योजना, प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, ऑनलाइन अर्जाच्या लिंक, अर्जाची सद्यस्थिती, तसेच तक्रार नोंदविणे अशा अनेक सुविधा मोबाईलवरून थेट उपलब्ध होत आहेत.
या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ वाचतो, कार्यालयातील गर्दी टाळली जाते आणि पारदर्शक व विश्वासार्ह माहिती सर्वांना मिळते. व्हॉटसॲप हे सर्वसामान्य नागरिकांना परिचित व सहज वापरता येणारे माध्यम असल्यामुळे ही सेवा अधिक परिणामकारक ठरते. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये सेवा देण्याची क्षमता असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनाही या सुविधेचा लाभ सहज मिळतो. ही सुविधा नागरिक-केंद्रित प्रशासनाचा उत्तम नमुना ठरत असून ‘डिजिटल इंडिया’च्या उद्दिष्टपूर्तीकडे एक महत्त्वाचे पाऊल ठरते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
याप्रसंगी शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना मुख्यमंत्री कार्यालयामार्फत देण्यात आलेले सन्मानपत्र पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis