प्रत्येक तालुक्यातील एक गाव मॉडेल म्हणून तयार करू – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, 17 सप्टेंबर, (हिं. स.) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या निमित्ताने प्रत्येक तालुक्यातील एका गावावर आपण लक्ष केंद्रित करू. प्रत्येक तालुक्यातील एक गाव मॉडेल गाव म्हणून तयार करू, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. मुख्यमंत
मिरजोळे ग्रामपंचायतीत लाभांचे वाटप


रत्नागिरी, 17 सप्टेंबर, (हिं. स.) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या निमित्ताने प्रत्येक तालुक्यातील एका गावावर आपण लक्ष केंद्रित करू. प्रत्येक तालुक्यातील एक गाव मॉडेल गाव म्हणून तयार करू, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ मिरजोळे (ता. रत्नागिरी) समूह ग्रामपंचायतीमधील बाळासाहेब ठाकरे सभागृहात पालकमंत्र्यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ज्या गावामध्ये आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ होत आहे, त्यांनी स्पर्धेतील पारितोषिकाचे लक्ष्य म्हणून काम करायला आजपासून सुरुवात करावी. आपली ग्रामपंचायत चांगल्या पद्धतीची असली पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा. आज निवड झालेली सर्व नऊ गावे महाराष्ट्राला आदर्शवत ठरतील. या गावांना आदर्श मॉडेल बनवण्यासाठी ज्या निधीची आवश्यकता लागेल, ती देण्याची जबाबदारी माझी असेल.

पालकमंत्री पुढे म्हणाले, मिरजोळे ग्रामपंचायत ही नवी रत्नागिरी आहे. जवळच सहा महिन्यांनंतर विमानतळ सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटक येणार आहेत. त्यामुळे नवी रत्नागिरी म्हणून विकसित होणारी मिरजोळे ग्रामपंचायत रत्नागिरी शहरापेक्षादेखील चांगल्या पद्धतीची असली पाहिजे. एवढीच तयारी आजपासून आपण करू या. ज्या गावात या अभियानाचा शुभारंभ होत आहे त्या गावाला या अभियानात बक्षस मिळालेच पाहिजे, असा संकल्प आपण आज करू या.

त्रिस्तरीय पंचायत राज योजनेला सुरुवात झाली. 1992 सालामध्ये 73 वी घटनादुरुस्ती झाली. त्यामध्ये खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला स्वायत्तता अधिकार प्राप्त झाले. 1992 सालानंतर गावाचा सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री झाला. त्यामुळे या अभियानामध्ये आपण अग्रेसर कसे राहू, ही त्यांच्यावर आणि त्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांची जबाबदारी आहे. रत्नागिरी शहरासह शहरालगतच्या 5 गावांच्या घनकचरा प्रकल्पाला 5 एकर जमीन एमआयडीसीने याआधीच दिलेली आहे. त्याचा डीपीआर सुरू आहे. 25 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या गावातील कचऱ्याची विल्हेवाट आपल्या गावातच लावली पाहिजे, अशी संकल्पना या अभियानामध्ये आहे.

आपले घर, आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची सुरुवात आपण आपल्यापासून करू या, असे आवाहन करून श्री. सामंत म्हणाले, महिला भगिनींना त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी त्यांना प्रशिक्षित केले पाहिजे. प्रत्येक महिलेने स्वत:च्या कमाईमधून 10 हजार महिना कमवले पाहिजेत, यासाठी आम्ही लखपती दीदी योजना महाराष्ट्रात राबवतोय. त्यातून 25 लाख महिला लखपती झाल्या आहेत. तो आकडा एक कोटीपर्यंत न्यायचा आहे. त्यातील पाच हजार महिला रत्नागिरीमधील असाव्यात. महिलांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, क्लस्टर, खादी ग्रामोद्योगमधून मधाचा उद्योग करावा. विश्वकर्मा योजनेमधील रोजगार करावा. काही महिलांनी स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी गट तयार करावेत. महिलांना आठ ठिकाणी सब्सिडी देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचे विभाग जे आहेत, ते माझ्याकडे आहेत. अभियान पुढे नेण्यासाठी आणि पंचायत राजचा पाया मजबूत करण्यासाठी आणि गावे स्वायत्त करवायाची असतील तर आपल्याला कटू निर्णय घ्यावे लागतील, असेही ते म्हणाले.

प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना शिधापत्रिका, उत्पन्नाचे दाखले याचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, गटविकास अधिकारी चेतन शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, मिरजोळेचे सरपंच रत्नदीप पाटील, बाळ सत्याधारी महाराज, उपसरपंच अशोक विचारे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande