मुंबई, 18 सप्टेंबर (हिं.स.)। गणपती उत्सवासाठी मुंबई,ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. यातुन एसटीला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. तथापि, आप-आपल्या गावी, वाडया-वस्त्यावर या लाखो कोकणवासीयांना सुखरूप घेऊन जाणारे आमचे बहाद्दर चालक-वाहक त्यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी व मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक -अधिकिरी अभिनंदनास पात्र आहेत. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी केले.
यंदा गणपती उत्सवासाठी एसटीद्वारे कोकण वासियांसाठी ५ हजार जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली होती. या बसेस द्वारे १५ हजार ३८८ फेऱ्यातून ५ लाख ९६ हजार प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला. अर्थात, एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित आणि अपघात विरहित वाहतूक करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
२३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळामध्ये चालवलेल्या या वाहतुकीमध्ये एसटी प्रशासनाने सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम मोडून काढत यंदा तब्बल ५००० बसेसद्वारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे. अर्थात, यासाठी राज्यभरातील विविध आगारातून आलेले १० हजार पेक्षा जास्त चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात एवढी प्रचंड वाहतूक सुरक्षित पार पाडली, ते कौतुकास्पद आहे , असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.
अर्थात, कोकणातील गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात आली होती. नादुरुस्त बसेस ना पर्याय म्हणून चिपळूण,महाड व माणगाव आगारात १०० बसेस तैनात ठेवल्या होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर