पुणे, 18 सप्टेंबर (हिं.स.)।
आगामी रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या उत्पादकतेला चालना देण्यासाठी विविध मोहिमांची अंमलबजावणी महाकृषी अॅपद्वारे करणे अनिवार्य करण्यात आले आहे. कृषी आयुक्तालयाने याबाबत सर्व विभागीय कृषी सहसंचालक आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना सूचना जारी केल्या आहेत. यामुळे शेतकरी अधिक आधुनिक तंत्रज्ञान आणि योजना आत्मसात करू शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
२०२५ च्या खरीप हंगामात महाकृषी अॅपवर ४, ३०, ७३३ मोहिमांची नोंदणी झाली असून, शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे कृषी आयुक्तालयाने नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामासाठीही अशाच प्रकारे मोहिमांची वेळेवर आणि अचूक नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अॅपवर सहायक कृषी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना लॉगिन आयडी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दरम्यान, २०२५-२६ च्या रब्बी हंगामासाठी पीक प्रात्यक्षिक आणि प्रमाणित बियाणे वितरणाबाबत अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, शेतकरी त्याचा लाभ घेऊ शकतात. यामुळे मोहिमांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा आहे. कृषी आयुक्तालयाने सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या मोहिमांची नोंदणी महाकृषी अॅपवर तात्काळ करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या दिशेने पावले टाकण्यास मदत होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु