तेल्हारा येथे शेतकरी-शेतमजुरांचा ‘आसुड मोर्चा’
अकोला, 18 सप्टेंबर (हिं.स.) : स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी विश्राम भवन, तेल्हारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी आणि शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी ‘आसुड मोर्चा’ जाहीर केला. हा मोर्चा सोमवार, दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी स
P


अकोला, 18 सप्टेंबर (हिं.स.) : स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी विश्राम भवन, तेल्हारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी आणि शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी ‘आसुड मोर्चा’ जाहीर केला. हा मोर्चा सोमवार, दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता टॉवर चौक ते तहसील कार्यालय, तेल्हारा या मार्गाने काढण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत बोलताना डिक्कर यांनी शेतकऱ्यांवरील कर्ज वसुलीविरोधात ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले, “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे. कापूस, सोयाबीन आणि तुरीसारख्या पिकांना उत्पादन खर्चाच्या दिडपट हमी भाव मिळावा. शेतमजुरांसाठी स्वतंत्र कल्याण महामंडळ स्थापन करावे. तेल्हारा तालुक्यातील गावांना वाण धरणातून तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करावा.” यंदा सततच्या पावसामुळे, हुमणी अळी आणि येलो मॉझेक रोगामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच, शालेय पोषण आहारात केळीचा कायम समावेश करून केळी पिकाला हमीभावाचे धोरण ठरवावे, असेही ते म्हणाले. प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनांनी यापूर्वीही सरकारला अनेकवेळा धडकी भरवली आहे. त्यामुळे या मोर्चाकडे अकोला जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या आशा-आकांक्षा केंद्रित झाल्या आहेत. “खोटी आश्वासने देणाऱ्या सरकारला सडो कि पडो करू,” असा इशारा डिक्कर यांनी दिला आहे. हा मोर्चा शेतकरी आणि शेतमजुरांच्या एकजुटीचे प्रतीक ठरणार असून, त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार यातून व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande