अकोला, 18 सप्टेंबर (हिं.स.) : अकोला जिल्ह्यात ख्रिश्चन धर्मांतरणाचे षडयंत्र रचल्या जात असल्याची दुसरी घटना उघडकीस आली आहे. या घटनेत येशूच्या प्रार्थनेला या ‘तुमचा घरगुती त्रास, दुःख, आजार नाहीसे होतील’ अशी अंधश्रद्धा पसरवून ख्रिश्चन झाल्यास एक लाख रुपये देतो, असे अमिष दाखविण्यात आले. तर तुम्ही आमच्या धर्मात न आल्यास तुमच्या घरात सुरू असलेला कलह, आजार बरे होणार नाहीत अशी धमकी देखील देण्यात आली. ही घटना8 बार्शिटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथे घडली. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांना चोहोगाव येथे संशयास्पद प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार ठाणेदार प्रवीण धुमाळ यांनी पथकासह सविस्तर तपास केला. त्यात हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सरपंच नारायण करवते यांनी बार्शिटाकळी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी ७ पुरूष व ३ महिलांसह १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
बार्शिटाकळी पोलिस ठाण्यात सरपंच नारायण करवते यांच्या तक्रारीनुसार ते गावात असताना सायंकाळी ७ च्या सुमारास गजानन काळे यांनी तुमच्या घरातील अडचणी आमच्या घरी नागपूर येथून आलेल्या जॉयसी देशपांडे आणि ऑगस्टीन देशपांडे हे ख्रिश्चन धर्मानुसार दूर करू शकतात. तुम्ही माझ्या घरी प्रार्थनेला या असे म्हटले. प्रार्थनेने तुमच्या घरातील कलह, आजार नाहीसे होतील, तुम्ही ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण केल्यास एक लाख रुपये देतो. तुला आमच्या धर्मात यावेच लागेल नाहीतर तुझ्या घरात सुरू असलेला कलह, आजार बरे होणार नाहीत अशी धमकी दिली. त्यांच्या सोबत असलेले काही जण अशीच धमकी देत होते, असे तक्रारीत नमूद आहे.
बार्शिटाकळी पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करून नागपूरच्या इंदोरा भागातील भंडार मोहल्ला येथे राहणार्या जॉयसी देशपांडे आणि ऑगस्टीन देशपांडे या दाम्पत्यासह गजानन काळे चोहोगाव, शीतल काळे चोहोगाव, हरिदास मासोळकर कन्हेरगांवनाका जि. हिंगोली, लक्ष्मण गिर्हे, कवळदरी ता. मालेगाव जि.वाशीम, गणेश पांडे, कवळदरी ता. मालेगाव जि. वाशीम, मुरलीधर तिवाले, धामनदरी ता. बार्शिटाकळी, विक्की काळे, रा. चोहोगाव, राधिका तिवाले रा. धामनदरी यांच्यावर गुन्हे दाखल केले. दरम्यान, याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र अंधश्रद्धा पसरवून भीती दाखविणार्या या प्रकरणात अंधश्रद्धेचा प्रसार करण्याबाबतचे गुन्हे दाखल नसल्याची चर्चा समाजात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे