चंद्रपूर, 18 सप्टेंबर (हिं.स.) : चंद्रपूर शहरातील रहमत नगर परिसरातील चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनच्या सिव्हेज ट्रीटमेंट प्लान्ट (STP PLANT) येथे क्लोरीन गॅस गळतीची घटना घडली. यासंदर्भात मनपा प्रशासनाकडून तातडीने नियंत्रणात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत संबंधित विभागांकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली असून सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने गळतीमुळे होणारा संभव्य धोका पाहता परिसरातील १२५ नागरिकांना मनपाच्या यंत्रणेद्वारे महात्मा ज्योतिबा फुले शाळा, किडवाई हायस्कूल येथे स्थलांतरित करण्यात आले. मनपाच्या प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी केली व प्रशासनास आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यानुसार मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त संदीप चिद्रावार यांनी प्रभावित नागरिकांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या व त्यानुसार सर्व नागरिक सुरक्षितरित्या स्थलांतरित करण्यात आले. तसेच, वैद्यकीय पथके व आपत्कालीन सेवा मनपाद्वारे घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. त्यानुसार परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून सर्व नागरिकांना घाबरून न जाण्याच्या विश्वास मनपाद्वारे देण्यात येत आहे. घटनास्थळी नियंत्रण ठेवण्यास पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, पोलीस निरीक्षक असिफ शेख, निशिकांत रामटेके, अमोल काचोरे, दंगा नियंत्रण पथक, इतर पोलीस अधिकारी व अमंलदार इत्यादी अधिकारी उपस्थित होते. स्थलांतरित १२५ नागरिकांना मनपाद्वारे सर्व सेवा उपलब्ध- स्थलांतरित करण्यात आलेल्या १२५ नागरिकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले शाळा व किदवाई हायस्कूल येथे राहण्याची, पाणी, जेवणाची व निवासाची संपूर्ण व्यवस्था मनपाद्वारे करण्यात आली आहे आणि मनपाचे सर्व अधिकारी व कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव