डेहारडून, १८ सप्टेंबर (हिं.स.): उत्तराखंडमधील अलकनंदा नदीकाठी बद्रीनाथ मार्गावर असलेल्या चमोली जिल्ह्यात ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. सहा घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. दोन जणांना वाचवण्यात आले आहे. सात जण बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे. चमोली जिल्हा दंडाधिकारी संदीप तिवारी यांनी सांगितले की, बेपत्ता नागरिकांना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा दंडाधिकारी संदीप तिवारी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील नंदनगर घाट परिसरात ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले. नंदनगरमधील कुंत्री लगा फली या वॉर्डमध्ये सहा घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. सात जण बेपत्ता आहेत, तर दोघांना वाचवण्यात आले आहे. तिवारी यांनी सांगितले की मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पाऊस संपत असतानाच विध्वंस झाला असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नंदनगरमधील फली कुंत्री, शांती कुंत्री, भैंसवाडा आणि धुर्माच्या वरील टेकड्यांवर ढगफुटी झाल्याने परिसरात प्रचंड नुकसान झाले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, एसडीआरएफची टीम नंदप्रयागला पोहोचली आहे. एनडीआरएफचे जवान गोचरहून नंदप्रयागला रवाना झाले आहेत. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, एक वैद्यकीय पथक आणि तीन १०८ रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांच्या मते मुसळधार पावसाने आधीच कहर केला आहे. मोक्ष नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. पावसात पाच घरेही उद्ध्वस्त झाली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे