पाकिस्तान आणि सौदी अरेबियाच्या संरक्षण करारावर भारताची प्रतिक्रिया
नवी दिल्ली , 18 सप्टेंबर (हिं.स.)। पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने बुधवारी(दि.१७) एक महत्त्वपूर्ण संरक्षण करारावर भारताने प्रतिक्रिया दिली
आहे. आम्ही आपल्या देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देण्याकरिता कटिबद्ध असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे
प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हंटले आहे.
पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने बुधवारी(दि.१७) एक संरक्षण करार केला आहे. या करारानुसार, दोन्ही देशांपैकी कुठल्याही एका देशावर हल्ला झाल्यास, तो हल्ला दुसऱ्या देशावरही झाल्याचे समजले जाईल.पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला आणि तिथे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी भेट घेतली. याच दरम्यान दोन्ही देशांमध्ये रणनीतिक परस्पर संरक्षण करारावरउ स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.आता या करारासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयसवाल यांनी प्रतिक्रिया दिली. जयस्वाल म्हणाले की, “आम्ही सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या रणनीतिक परस्पर संरक्षण कराराच्या बातम्या पाहिल्या आहेत. सरकारला हे माहीत होतं की हा घटनाक्रम, जो दोन्ही देशांमधील दीर्घकालीन व्यवस्थेला औपचारिक रूप देतो, विचाराधीन होता.आम्ही आमच्या राष्ट्रीय सुरक्षेवर तसेच प्रादेशिक आणि जागतिक स्थैर्यावर या घटनाक्रमाचा काय परिणाम होतो, याचा सखोल अभ्यास करू. सरकार भारताच्या राष्ट्रीय हितांचे संरक्षण करण्यासाठी आणि सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
, पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आलं आहे की, या करारावर स्वाक्षरी झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.या घोषणेत असं स्पष्ट करण्यात आलं आहे की, दोन्ही देशांपैकी कोणत्याही एका देशावर झालेला कोणताही हल्ला हा दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल.करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर पाकिस्तान आणि सौदी अरेबियाकडून एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं.त्यामध्ये नमूद करण्यात आलं, “सुमारे आठ दशके जुनी भागीदारी पुढे नेत आणि बंधुत्व, इस्लामी एकता आणि सामायिक रणनीतिक हितसंबंधांच्या आधारे, दोन्ही पक्षांनी रणनीतिक परस्पर संरक्षण करारावर सहमती दर्शवली आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode