डब्लिन, 18 सप्टेंबर (हिं.स.) इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना द व्हिलेज, डब्लिन येथे खेळला गेला. फिल सॉल्टच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने आयर्लंडला ४ विकेट्सने पराभव करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्टने ४६ चेंडूत ४ षटकार आणि १० चौकारांसह ८९ धावा केल्या. सॉल्टने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४१ धावांची मॅरेथॉन खेळी करत त्यांचा पराभव केला होता. सॉल्टने फक्त ३९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते.
सॉल्टच्या या खेळीमुळे इंग्लंडचा विजय सोपा झाला. एका क्षणी असे वाटत होते की, सॉल्ट त्याचे शतक पूर्ण करेल. पण त्याचे शतक अवघ्या ११ धावांनी हुकले. इंग्लंडने १७.४ षटकांत ६ गडी गमावून १९७ धावा करत ४ विकेट्सने हा सामना जिंकला. सॉल्ट व्यतिरिक्त, जोस बटलरने १० चेंडूत २८ धावा, कर्णधार जेकब बेथेलने १६ चेंडूत २४ धावा आणि सॅम करनने १५ चेंडूत २७ धावा केल्या.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने २० षटकांत ३ गडी गमावून १९६ धावा केल्या. हॅरी टेक्टरने ३६ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ६१ धावा आणि लोर्कन टकरने ३६ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांसह ५५ धावा केल्या. कर्णधार पॉल स्टर्लिंगने २२ चेंडूत ३४ धावा आणि रॉस अडायरने २५ चेंडूत २६ धावा केल्या.
या सामन्यात जेकब बेथेलने इतिहास रचला. नाणेफेकीसाठी मैदानात उतरल्यानंतर तो इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात तरुण कर्णधार बनला. त्याचे कर्णधारपदाचे पदार्पण संस्मरणीय होते. त्याच्या संघाने हा सामना ४ विकेट्सने जिंकला. पण फलंदाज म्हणून त्याचा सामना निराशाजनक राहिला आणि त्याने फक्त २४ धावा या सामन्यामध्ये केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे