रत्नागिरी, 18 सप्टेंबर, (हिं. स.) : येथील खल्वायन संस्थेच्या सलग ३१७ व्या मासिक संगीत सभेत सौ. मुग्धा भट-सामंत यांचे भारदस्त गायन झाले.
नेहमीप्रमाणेच सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात ही सभा झाली. कै. अन्नपूर्णा ऊर्फ गोदूताई अनंत जोगळेकर स्मृती मासिक संगीत सभा म्हणून साजऱ्या झालेल्या या संगीत सभेत रत्नागिरीच्या प्रसिद्ध गायिका व गुरू सौ. मुग्धा भट-सामंत यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच नाट्य-भक्तीगीतांच्या सुमधुर व भारदस्त सादरीकरण झाले. गेली २५ वर्षे रत्नागिरीमध्ये शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी शास्त्रीय संगीताचे उत्तम ज्ञान देभन नवीन पिढीवर शास्त्रीय संगीताचे चांगले संस्कार केले आहेत.
सुरुवातीला डॉ. श्रीराम केळकर यांच्या हस्ते नटराज पूजन, दीपप्रज्वलन झाले. प्रदीप तेंडुलकर यांनी प्रास्ताविक व कलाकारांची ओळख करून दिली. अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते सर्व कलाकारांना सन्मानित करण्यात आले.
मैफलीची सुरवात सौ.मुग्धा सामंत यांनी बिहागडा रागातील विलंबित तिलवाडा तालात निबद्ध असलेल्या ऐ मन मोहलिया या बंदिशीने केली. याला जोडून द्रुत तीन तालातील अब दे रंग दे ही बंदीश नंतर राग केदारमधील मध्यलय झपतालातील मालनिया सजचली ही बंदीश व याला जोडून द्रुत तीन तालातील सय्या मोरा रे ही बंदीश त्यांनी सादर केली. गुरू सौ. मंगला आपटे, कै. कुसुम शेंडे, कै. वीणा सहस्रबुद्धे, सौ. पद्मा तळवळकर, पं. विकास कशाळकर या नामवंत गुरूंकडून शास्त्रीय गायनाची पक्की तालीम घेतलेल्या मुग्धा यांनी दोन्ही रागांची मांडणी आपल्या भारदस्त, दमदार स्वरांनी उत्तम प्रकारे केली. सहजतेने घेतलेल्या आलाप, ताना, तिन्ही सप्तकात फिरणारा दमदार मधुर आवाज यामुळे मैफलीत सुरवातीलाच त्यांनी रंग भरला. त्यानंतर दुर्गामाता भवानीदेवी या १३ रागांचे मिश्रण असलेल्या रागमालेच्या सादरीकरणातून त्यांनी आपले शास्त्रीय गायनातील प्रभुत्व सिद्ध केले. यानंतर भासे मनात राया, प्रीती सुरी दुधारी, प्रियाघे निजांकी जाता ही नाट्यपदे त्यानंतर एक दादरा, नंतर योगिया दुर्लभ हा अभंग व शेवटी श्रीपाद वल्लभ दिगंबरा या भैरवीतील अभंगाने त्यांनी आपल्या मैफलीचा शेवट केला.
मैफिलीला तेवढीच दमदार साथसंगत हेरंब जोगळेकर (तबला), श्रीरंग जोगळेकर (हार्मोनियम), मंगेश चव्हाण (पखवाज), हर्ष बोंडाळे (तालवाद्य), सार्था गवाणकर व सानिका लिंगायत (तानपुरा) यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी