अमरावती, 18 सप्टेंबर (हिं.स.)
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त १९ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या संकल्पनेतून विभागातील सर्व जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची एकत्रित महसूल परिषद आयोजित करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने आयोजित या अनोख्या परिषदेमध्ये प्रामुख्याने तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून महसूल अधिकाऱ्यांसाठी विविध प्रशासकीय कार्यांचे सुलभीकरण तसेच प्रशासनातील कार्यप्रवाहाची सुधारणा होण्यासाठी मार्गदर्शन केल्या जाणार आहे. या परिषदेत भुसंपादन व पुनवर्सन, पाणंद रस्ते विषयक मोहिम, जिआयएस टॅगींग, जीओ फेन्सींग, लँड बँक, रोकड नोंदवही हाताळणे, जमीन वाटप प्रकरणे, शर्तभंग प्रकरणे, अर्धन्यायिक प्रकरणे, सादरकर्ता अधिकाऱ्यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या आदी संदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केल्या जाणार आहे. तसेच ई-गव्हर्नन्स अंतर्गत अमरावती विभागात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती या परिषदेत महसूल अधिकाऱ्यांना दिली जाणार आहे. ही परिषद विभागातील सर्व महसूल अधिकाऱ्यांकरिता त्यांच्या करिअरला अधिक समृद्ध करणारी ठरणार आहे. त्यामुळे या परिषदेला विभागातील सर्व महसूल अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी