मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार
कोल्हापूर, 18 सप्टेंबर (हिं.स.) - माझ्या 75 व्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते. नरेंद्र मोदींनी राजकारण आणलं नाही, आम्हीही आणत नाही. तसेच आता मी वयाच्या ७५ वर्षांनंतर थांबलो नाही, तर मला मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा नैतिक अधिकार नाही
शरद  पवार यांची पत्रकार परिषद


कोल्हापूर, 18 सप्टेंबर (हिं.स.) - माझ्या 75 व्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते. नरेंद्र मोदींनी राजकारण आणलं नाही, आम्हीही आणत नाही. तसेच आता मी वयाच्या ७५ वर्षांनंतर थांबलो नाही, तर मला मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा नैतिक अधिकार नाही. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान पंचाहत्तरीनंतर थांबू असे बोललोच नव्हतो, असं काही लोक म्हणतायत, हेही सांगायला ते विसरले नाहीत. मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आहेत आणि देशासाठी त्यांना जे काही करायचे आहे, ते त्यांनी योग्य करावे, अशी सदिच्छाही व्यक्त केली.

महापालिका निवडणुका आणि पक्षीय बांधणीच्या अनुषंगाने पवार आज सकाळी कोल्हापूरात पोहोचले. त्यानिमित्त त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवरायांबद्दल आपण सगळेच आदर व्यक्त करतो. एकदा शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसात सोन्याचा नांगर केला. सोन्याचा नांगर वापरुन शिवरायांनी एक संदेश दिला. सध्या शेतीचं नुकसान झालंय. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, शेतीचं नुकसान झालंय. जमिनी वाहून गेल्या, सोयाबीन उद्ध्वस्त झालं. सरकार पंचनामे कधी करतंय, मदत कधी पोहोचतेय, देवाभाऊंनी पंचनामे आणि मदतीकडे लक्ष द्यावं, असंही पवार म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीबाबत भाष्य करताना ते म्हणाले, सगळीकडंच मविआची युती असेल, असं नाही. स्थानिक समीकरणं बघून निर्णय घेऊ. काही ठिकाणी एकत्र लढू, काही ठिकाणी स्वतंत्र लढू. ठाकरे बंधू एकत्र येऊन ताकद वाढली तर चांगलंच आहे. मुंबई, ठाण्यामध्ये ठाकरेंची ताकद, शक्ती आहे. मुंबई, ठाण्यात ठाकरेंनी जास्त जागा मागण्यात गैर काही नाही, असंही पवार म्हणाले.

हैदराबाद गॅझेट एक दिशा दाखवणारं आहे. मला स्वतःला हैदराबाद गॅझेटबद्दल माहिती नव्हती. आपल्यातली एकीची वीण उसवू नये. कटुता वाढू नये, सुसंवाद वाढावा. सरकारने मराठा आणि ओबीसींची समिती स्थापन केली. दोन्ही समित्यांत एकाच जातीचे सदस्य आहेत. ऐक्य घडवायचं तर समित्यांत एकाच जातीचे लोक का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. परभणी, बीड, धाराशिवमध्ये मराठा-ओबीसींमध्ये कटुता वाढली. एकमेकांच्या हॉटेलातही जायचं नाही अशी कटुता वाढलीय. 1994 साली हा आरक्षणाचा प्रश्नच नव्हता. विविध समाजाला लाभ व्हावा म्हणून मंडल अहवालावर निर्णय घेतले. मंडल आयोगाच्या अहवालावर सर्वांनी मिळून निर्णय घेतले. कटुता टाळण्याला मला हातभार लावायचा आहे. देशात आरक्षणाचा विचार कोल्हापुरातून निर्माण झाला. माझ्या मते शाहू महाराजांचा व्यापक हेतू आजही ठेवायला हवा, असं मतही व्यक्त केलं.

निवडणूक आयोगाच्या काही निर्णयावर देशात नाराजी आहे. 300 खासदारांनी प्रथमच निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. 300 खासदार रस्त्यावर येतात ही दुर्लक्ष करणारी बाब नाही. निवडणूक आयोगानं आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे. 300 खासदार मोर्चा काढतात ही लहान-सहान गोष्ट नाही. तसेच खासदारांसोबत बैठकीलाही अटी तटी घालणं योग्य नाही. राहुल गांधी मतदारसंघनिहाय काय गडबड झाली ते सांगतायत. राहुल गांधींच्या आरोपानंतर आयोगानं आपली विश्वासार्हता वाढवावी. राहुल गांधींच्या आरोपानंतरही आयोग खबरदारी घेताना दिसत नाही. निवडणूक प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास आयोगानं वाढवावा. राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बची मीही वाट बघतोय, असंही पवारांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande