नांदेड, 19 सप्टेंबर (हिं.स.) : केळी-उत्तम कृषी पद्धती प्रशिक्षण वर्ग संपन्न सहकार व पणन विभागाकडून आशियाई विकास बँक अर्थसाहित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, आत्मा व कृषी विभाग नांदेड व हिरकणी बायोटेक अर्धापूर नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने अर्धापूर येथे केळी-उत्तम कृषी पद्धती प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले. नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सोसायटीचे चेअरमन धर्मराज देशमुख, केळी संशोधन केंद्राचे डॉ. शिवाजी शिंदे, अर्धापूर तालुका कृषी अधिकारी एस. एस. देवकांबळे, महाकृषी शेतकरी उत्पादक कंपनी उपसर सोलापूरचे व्यवस्थापक नरहर कुलकर्णी, प्रगतशील शेतकरी निलेश देशमुख, हिरकणी बायोटेक व्यवस्थापकीय संचालक रत्नाकर देशमुख, केळी तज्ज्ञ हेमंत कदम, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप, गजेंद्र नवघरे,अक्षय हातागळे, मॅग्नेट प्रकल्प लातूरचे श्री शेलार आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम मॅग्नेट प्रकल्पाने केळी पिकाचा कार्यक्रम अर्धापूर येथे घेतल्याबद्दल प्रकल्पाचे धर्मराज देशमुख यांनी आभार मानले. नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात भाव मिळावा अशी इच्छा व्यक्त केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निर्यातक्षम केळी पिकाचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन केले. डॉ. शिवाजी शिंदे यांनी नांदेड जिल्ह्यातील केळी पीक संशोधन केंद्राचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचा आवाहन केले. तसेच उत्तम प्रतीच्या केळीच्या घडांची निर्मिती याविषयी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी देवकांबळे यांनी केळी पिकासाठी विविध शासनाच्या योजना विषयी माहिती दिली. डॉ. नरहरी कुलकर्णी यांनी केळी पीक उत्पादनातील संधी व आव्हाने यावर मार्गदर्शन केले. तसेच केळी उत्तम कृषी पद्धती यामधील बारकावे समजून सांगितले. निर्यात क्षम केळी रोपांची निर्मिती यामधील बारकावे रत्नाकर देशमुख यांनी समजून सांगितले. केळीचे मार्केटिंग तंत्रज्ञान व रोपवाटिकेमधील योग्य रोपांची निवड यावर हेमंत कदम यांनी मार्गदर्शन केले. लिंग समावेशन व सामाजिक समानता याविषयी अक्षय हातागळे यांनी मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी किशोर देशमुख यांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केळी पिकासाठी असलेली संधीचे महत्त्व विशद करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शीत साखळी तंत्रज्ञानाचा वापर करावा असे सांगितले. निर्यादक्षम केळी पिकाचे धोरण शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केले. प्रास्ताविकात हेमंत जगताप यांनी महामंडळाला नांदेड जिल्ह्यात केळी पीक कार्यशाळा घेण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मॅग्नेट प्रकल्पाचे आभार मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन हेमंत जगताप यांनी केले तर आभार गजेंद्र नवघरे यांनी मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कृषी विभाग अर्धापूर व हिरकणी बायोटेक अर्धापूर यांच्या सर्व टीमचे सहकार्य लाभले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis