अबुधाबी , 19 सप्टेंबर (हिं.स.)।आशिया कप 2025 च्या ग्रुप बी सामन्यात अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबी यांनी आपल्या फलंदाजीने खळबळ उडवून दिली. 40 वर्षीय नबीने श्रीलंकेविरुद्ध शेवटच्या षटकात सलग 5 षटकार मारून एक विक्रम रचला. मात्र, एका षटकात 32 धावा काढूनही अफगाणिस्तानला विजय मिळवता आला नाही. श्रीलंकेने हा सामना 6 गडी राखून जिंकला आणि सुपर फोरमध्ये आपले स्थान निश्चित केले.
अफगाणिस्तानच्या डावाचे 20वे षटक श्रीलंकेचा युवा फिरकीपटू दुनिथ वेलालागे टाकत होता. नबीने त्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार ठोकले. दबावात येऊन वेलालागेने चौथा चेंडू नो बॉल टाकला आणि त्या चेंडूवरही नबीने षटकार मारला. यानंतर पाचव्या चेंडूलाही त्यांनी थेट स्टँडमध्ये पाठवले. मात्र, सहाव्या चेंडूवर नबी रनआऊट झाले.
या एका षटकातून नबीने एकूण 32 धावा घेतल्या आणि आपली खेळी अविस्मरणीय बनवली. त्यांच्या जोरदार फलंदाजीमुळे अफगाणिस्तानने 20 षटकांत 8 बाद 169 धावा केल्या. नबीने फक्त 22 चेंडूंमध्ये 60 धावा केल्या, ज्यामध्ये 6 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. त्यांचा स्ट्राइक रेट 272 पेक्षा अधिक होता.नबीने अशाप्रकारे अफगाणिस्तानसाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतक (20 चेंडू) करण्याचा विक्रम बरोबरीने केला आहे. यापूर्वी, अजमतुल्ला उमरजई यांनी हाँगकाँगविरुद्ध याच स्पर्धेत 20 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.
श्रीलंकेने 169 धावांचा पाठलाग करताना जबरदस्त सुरुवात केली. टॉप ऑर्डरने धावगती कायम ठेवली आणि मधल्या वेळेत काही गडी बाद झाले तरी संघावर फारसा दबाव आला नाही. अखेर, श्रीलंकेने 19व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आणि अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला.
दुनिथ वेलालागेसाठी हा दिवस अत्यंत वाईट ठरला. नबीच्या तुफानी फटकेबाजीमुळे वेलालागे टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेसाठी सर्वाधिक महागडे षटक टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्याआधी, 2021 मध्ये अकिला धनंजय यांनी एका षटकात 36 धावा दिल्या होत्या, जेव्हा वेस्ट इंडिजच्या केरॉन पोलार्ड ने त्यांच्यावर सालग 6 षटकार मारले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode