अबुधाबी, 18 सप्टेंबर (हिं.स.) आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात भारतीय संघाचा मुकाबला ओमानशी होणार आहे. भारतीय संघाने सुपर ४ मध्ये आधीच प्रवेश मिळवला आहे. रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी ओमान विरुद्ध आपल्या फलंदाजांना संधी देण्याची ही सुवर्णसंधी आहे.
भारताने यापूर्वी संयुक्त अरब अमिराती आणि पाकिस्तानविरुद्ध सहजतेने लक्ष्याचा पाठलाग केला होता. अभिषेक शर्माने अपेक्षेप्रमाणे चांगली सुरुवात केली आहे. पण शुभमन गिलला अजून फारशी कमाल करता आलेली नाही. कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. दरम्यान, भारत जर अंतिम फेरीत पोहोचला तर त्यांना सात दिवसांत चार सामने खेळावे लागतील. आणि संघ व्यवस्थापन हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांनाही काही फलंदाजीच्या संधी देऊ इच्छिते.
भारतीय गोलंदाजी इतकी मजबूत आहे की, जर ओमानने प्रथम फलंदाजी केली तर सामना लवकर संपण्याची शक्यता आहे. कारण जतिंदर सिंगच्या नेतृत्वाखालील संघ कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती सारख्या गोलंदाजांचा सामना करु शकणार नाही. पाकिस्तान आणि युएई विरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये ओमानची फलंदाजी सर्वोत्तम नव्हती. ओमानच्या फलंदाजांना दोन्ही सामन्यांमध्ये एकाही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. हम्माद मिर्झाने पाकिस्तान विरुद्ध २७ धावा केल्या होत्या. तर आर्यन बिश्तने युएई विरुद्ध ३२ चेंडूत २४ धावा केल्या होत्या.
भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आपल्या संघासोबत जास्त प्रयोग करू इच्छित नाहीत. जर त्यांनी ठरवले तर सुपर ४ च्या आधी जसप्रीत बुमराहला थोडी विश्रांती देणे वगळता संघात फारसे बदल अपेक्षित नाहीत. या सामन्यात संघ व्यवस्थापन वरुण आणि कुलदीपपैकी एकाला विश्रांती देऊ शकते आणि हर्षित राणाला संधी देऊ शकते. तर ओमानसाठी हा एक मोठा सामना असेल आणि त्यांचे क्रिकेटपटू या सामन्यात आपली वेगळी छाप सोडण्यास उत्सुक असतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे