कोल्हापूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे हिमालया बेबी केअर, मुंबई या कंपनीकडून सी. एस.आर अंतर्गत दोन शिशु आहार केंद्र (बेबी फीडिंग पॉड) देणगी स्वरूपात देण्यात आले आहे. सदर शिशु आहार केंद्र बाह्यरुग्ण विभागामधील औषध वितरण कक्षाच्या समोर आणि कोयना इमारतीमध्ये बालरोगशास्त्र विभागाच्या बाह्यरुग्ण विभाग येथे उभारण्यात आले आहेत.
सदर शिशु आहार कक्षामुळे रुग्णालयात येणाऱ्या स्तनदा मातांना त्यांच्या बालकांना स्तनपान करणे, खाऊ घालणे, डायपर बदलणे याकरिता याचा उपयोग होणार आहे.
सदर शिशु आहार कक्ष हा पूर्णपणे बंदिस्त आहे. तसेच यामध्ये बसण्यासाठी कोचची व्यवस्था आहे. त्याचबरोबर फॅन, लहान मुलांचे डायपर, तसेच डायपर डिस्पोज करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या कक्षाचे उद्घाटन या महाविद्यालयाचे मा.अधिष्ठता डॉ.अजित लोकरे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भूषण मिरजे, यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बालरोगशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ.संगीता कुंभोजकर, डॉ.शिशिर मिरगुंडे (माजी वैद्यकीय अधीक्षक सीपीआर रुग्णालय), डॉ.गिरीश कांबळे, समाजसेवा अधिक्षक विभागाचे नोडल अधिकारी श्री शशिकांत राऊळ, समाजसेवा अधीक्षक श्री. बाजीराव आपटे, श्री.केदार ढेकणे, श्री.महेंद्र चव्हाण, श्री.अजित भास्कर, सौ. सुनीता जाधव, श्रीम.रोहिणी गांगुर्डे, हे उपस्थितीत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांनी हिमालया बेबी केअर कंपनीचे आभार मानले आणि सदर शिशु आहार केंद्र(बेबी फिडिंग पॉड) हे रुग्णालयात येणाऱ्या स्तनदा मातांना अतिशय उपयुक्त आणि सुरक्षित असल्याचे सांगितले. या उद्घाटनप्रसंगी हिमालया बेबी केअर कंपनीचे कर्मचारी, महाविद्यालय व रुग्णालयाकडील अधिकारी, कर्मचारी, नर्सिंग स्टाफ व सर्व समाजसेवा अधीक्षक तसेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar