अमरावती, 19 सप्टेंबर (हिं.स.) : अमरावती शहरात मुतारी,स्मशानभूमी, दारू दुकाने, कचऱ्याची ढिगारे व सर्विस गल्ल्यांची भिंतींसारख्या आक्षेपार्ह ठिकाणी लावण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोस्टर्स विरोधात युवक कॉंग्रेसने दोन दिवसांपूर्वी तीव्र आंदोलन करून ही पोस्टर्स झाकली होती. तसेच यासंबंधी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला युवक काँग्रेसने पोलीस तक्रार सुद्धा दाखल केली होती.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल अमरावती दौऱ्यावर असताना यासंबंधी कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त यांच्याशी फोनवर चर्चा सुद्धा केली होती. मात्र तरीही ही प्रशासनाकडून या पोस्टर्स संबंधी कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती हे विशेष. अशातच गुरुवारी शिवरायांच्या या पोस्टर शेजारी लघुशंका करणाऱ्या व्यक्तींचा फोटो सोशल मीडिया द्वारे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाला. त्यामुळे संतप्त होत युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तातडीने मनपा आयुक्त यांच्या दालनात धडक दिली. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीसंदर्भात असलेल्या बैठकीमुळे कुठलाही अधिकारी महापालिकेत उपस्थित नव्हता. त्यामुळे संतप्त युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडला. शिवरायांचा हा अपमान युवक काँग्रेस कदापि सहन करणार नसून यापुढे अशाप्रकारांमुळे शहरात कुठलीही अनुचित घटना घडल्यास त्याला सर्वस्वी मनपा प्रशासन व पोलीस प्रशासन जबाबदारी राहील अशी भूमिका यावेळी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली. तब्बल तीन तास ठिय्या देत यावेळी मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अखेर युवक काँग्रेसच्या या आक्रमक भूमिकेपुढे मनपा प्रशासनाने नमते घेत शहरातील हे सर्व आक्षेपार्ह पोस्टर्स रंगवण्याची युवक काँग्रेसची मागणी मान्य केली. मनपा प्रशासनाने युवक कॅांग्रेस पदाधिकाऱ्यांना सोबत घेत या प्रकारचे पोस्टर्स रंगविण्यास सुरुवात केली असून येत्या दोन दिवसात अशा पद्धतीचे सगळे पोस्टर्स रंगविण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी मनपा प्रशासनाने युवक काँग्रेसला दिले.अमरावतीकर नागरिकांनी सुद्धा शिवछत्रपतींचा सन्मान जपत अशा पद्धतीचे पोस्टर्स कुठेही आढळून आल्यास मनपा प्रशासन अथवा युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याची माहिती द्यावी असे आवाहन सुद्धा यावेळी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आले.या ठिय्या आंदोलनात अमरावती विधानसभा युवक कॅांग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख, माजी प्रदेश सचिव समीर जवंजाळ, शहरजिल्हा उपाध्यक्ष अनिकेत ढेंगळे, प्रदेश सचिव सागर कलाने, बडनेरा विधानसभा उपाध्यक्ष आशिष यादव, जिल्हा महासचिव निखिल बिजवे, एनएसयुआय शहराध्यक्ष संकेत साहू, धनंजय बोबडे, मोहित भेंडे, आकाश धुराटकर, शुभम बांबल, आकाश गेडाम, चैतन्य गायकवाड, कौस्तुभ देशमुख हे युवक कॅांग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी