कोल्हापूर, 19 सप्टेंबर, (हिं.स.)। खुल्या प्रवर्गातील तरुणांना शैक्षणिक, रोजगार विषयक मदत करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील हुशार मुलांसाठी विविध योजना, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अमृत ही संस्था कार्य करत आहे. याच उद्देशाने ब्राह्मण सभा करवीर (मंगलधाम) यांच्यावतीने नुकतेच अमृत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यामध्ये खुल्या प्रवर्गातील समाजातील विशेषतः ब्राह्मण, गुजराती, सिंधी, पटेल, पाटीदार ई युवकांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे व स्वतः च्या पायावर उभे करून आर्थिक विकास करून देणे हा उद्देश आहे. यामध्ये विविध संस्थांचे, बँकांचे स्टॉल व मार्गदर्शन व नोंदणी अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, कोकण विभागाचे अमित सामंत, दीपक जोशी, अजित ठाणेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी किरण धर्माधिकारी, प्रथमेश कुलकर्णी, प्रशांत जोशी, संतोष कोडोलीकर, प्रसाद खाडीलकर, ॲड. पूजा जोशी, अनुराधा गोसावी, वृषाली कुलकर्णी, नितीन कुलकर्णी, अमित कुलकर्णी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar