छत्रपती संभाजीनगर, 19 सप्टेंबर, (हिं.स.)। शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षात महाडिबीटी पोर्टलवरील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते.
या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलवर भरण्यात येतात. त्यासाठीची कारवाई दि.३१ ऑगस्ट पासून सुरु झाली आहे. याबाबत सर्व महाविद्यालयांना सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५३८१ अर्ज भरण्यात आले असून हे सर्व महाविद्यालयांच्या लॉग इन वर प्रंबित असल्याचे दिसून येत आहे. तरी सर्व महाविद्यालयांनी आपल्यास्तरावर अर्ज मंजूर करुन पुढील मंजूरीसाठी सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण या कार्यालयाच्या लॉग इन वर पाठवावे. महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयातील समान संधी केंद्राद्वारे पात्र विद्यार्थ्यांना योजनेच्या लाभाविषयी मार्गदर्शन करावे.शिष्यवृत्तीचे आवेदन पत्र विहीत मुदतीत सादर न झाल्यास व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित महाविद्याल्याच्या प्राचार्यांची राहील, असे आवाहन सहायक संचालक दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis