दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला दिले आव्हान
नवी दिल्ली,19 सप्टेंबर (हिं.स.) : दिल्ली दंगलीतील कट रचल्याप्रकरणी अटकेत असलेल्या उमर खालिद, शरजील इमाम आणि इतर अनेक आरोपींच्या जामिनाच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी, 22 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या सर्वांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या जामिन फेटाळणाऱ्या निर्णयाला आव्हान दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने उमर खालिद, शरजील इमाम, गुलफिशा फातिमा, मीरान हैदर आणि शिफा-उर-रहमान यांच्या याचिकांवर सुनावणी पुढे ढकलली आहे. या सर्वांवर यूएपीए आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.दिल्ली उच्च न्यायालयाने 2 सप्टेंबर 2025 रोजी उमर खालिद, शरजील इमामसह 9 आरोपींच्या जामिनाच्या अर्जांना नकार दिला होता. न्यायालयाने नमूद केले की, प्रदर्शनाच्या किंवा आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार घडवण्याचा कट रचण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.ज्या आरोपींच्या याचिका फेटाळण्यात आल्या, त्यामध्ये उमर खालिद, शरजील इमाम, मोहम्मद सलीम खान, शिफा-उर-रहमान, अतहर खान, मीरान हैदर, अब्दुल खालिद सैफी, गुलफिशा फातिमा,शादाब अहमद तसेच, तस्लीम अहमद यांचीही जामिन याचिका न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठाने फेटाळली होती.
संविधानातील अधिकार व मर्यादा यावर न्यायालयाचे भाष्य
उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, भारतीय संविधान नागरिकांना शांततापूर्ण आंदोलन व अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतो, पण हे अधिकार मर्यादित आहेत. कोणताही आंदोलन शांततापूर्ण, संयमित आणि कायद्याच्या चौकटीत असणे गरजेचे आहे. कोर्टाने नमूद केले की, संविधानाच्या अनुच्छेद 19 (2)(अ) अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकार आहे, मात्र त्यावर योग्य मर्यादा घालता येऊ शकतात, अन्यथा कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो.
दिल्ली दंगलीतील गंभीर आरोप
उमर खालिद, शरजील इमाम आणि इतर आरोपींवर आरोप आहे की, फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या दिल्ली दंगलींची साजिश त्यांनी रचली. या दंगलींमध्ये 53 जणांचा मृत्यू झाला होता आणि 700 हून अधिक लोक जखमी झाले होते. ही दंगल सीएए-एनआरसी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उसळली होती. हे सर्व आरोपी सध्या 2020 पासून तुरुंगात आहेत. त्यांची जामिन याचिका आधी खालच्या न्यायालयाने फेटाळली, त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी