ठाणे, 19 सप्टेंबर (हिं.स.)। घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रात्री १२ ते सकाळी ६ या काळात जड अवजड वाहने सोडण्याचे आदेश असताना गायमुखजवळ काही वाहतूक कर्मचारी या वाहनांना प्रवेश देत आहेत. या कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची गरज असल्याचे मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले.
जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात आमदार संजय केळकर पत्रकारांशी बोलत होते. सकाळी ६पासून रात्री १२ वाजेपर्यंत १८ तास जड अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र गायमुखजवळ काही कर्मचारी ही वाहने सोडत असतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई व्हायला हवी. वाहतूक विभागाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी व्हायला हवी. पुढील काळात कोस्टल रोड, मेट्रो सुरू झाल्यावर वाहतुकीच्या अडचणी दूर होणार आहेत. तर दिल्ली-मुंबई मार्ग सुरू झाल्यानंतर वसईपुढे ही वाहतूक वळून घोडबंदरकडे येणार नाही.मात्र यासाठी काही काळ लागेल. तोपर्यंत यंत्रणांनी सावध राहायला हवे, खड्डे होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी, सेवा रस्ते मोकळे ठेवावेत, वाहतूक नियमन नीट होईल याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष पुरवावे, असे आवाहन श्री.केळकर यांनी केले.
खोपट येथील भाजप कार्यालयात आज शुक्रवारी झालेल्या आमदार संजय केळकर यांच्या जनसेकाचा जनसंवाद या कार्यक्रमात विविध तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात विकासकाने केलेली घरासंदर्भातील फसवणूक, इमारतीच्या ओसी, महानगर गॅस, पाणी, महापालिका वारसा हक्क, पतपेढी फसवणूक, एसआरए, ड्रेनेज लाईन, गृहसंकुलातील अनधिकृत बांधकाम, चिपळूण येथील प्रांत कार्यालयातील विषय, अशा विविध विषयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या.
यावेळी ठाण्यातील स्वामी कृपा सोसायटीचा पाणी टंचाईचा प्रश्न सोडवल्याने येथील सभासदांनी आ. केळकर यांचे आभार मानले. ज्येष्ठ नागरिकांना बसण्याकरिता बेंच, डस्टबीन सोसायटीला दिल्याचे रहिवाशांनी सांगितले.
ठामपामध्ये कोव्हीड काळात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पूर्वीपासून सेवेत कामाला असलेल्या वैद्यकीय व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनातील असमानता दूर करण्याबाबत आ. केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना केल्या.
कोकणातील चिपळूण येथे पाठबंधारे विभागाने ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना त्याचा मोबदला मिळाला नसल्याने या लोकांनी आ. केळकर यांची आज भेट घेतली. आ. केळकर यांनी चिपळूण येथील प्रांत अधिकारी श्री. लीगाडे यांना त्वरित फोन करून याबाबत विचारणा करून त्यांना मोबदला देण्याच्या सूचना केल्या. यामुळे आता संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उपक्रमात ठाण्यातूनच नव्हे तर मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, दादर, डोंबिवली, कल्याण, वसई, विरार, मुरबाड, शहापूर आदी विविध भागातून नागरिक आपल्या तक्रारी घेऊन येतात. आ. केळकर यांच्या कामाच्या पद्धतीमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळेच आता कोकणातूनही त्यांच्याकडे तक्रारी येत आहेत.
यावेळी जनसंवाद कार्यक्रमाला ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, माजी नगरसेवक भरत चव्हाण, माजी नगरसेविका व ठाणे महिला मोर्चा अध्यक्षा मृणाल पेंडसे, राजेश गाडे, अमित सरय्या, जितू मढवी, विशाल वाघ आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर