लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।
अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेल्या नुकसानीसाठी प्राप्त झालेल्या २४४ कोटी रुपये मदतीचे वितरण तातडीने होणे आवश्यक आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास गती द्यावी. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी संवेदनशील राहून पंचनामे करावेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेताना दिल्या.
पुराच्या पाण्यामुळे शेती, घराचे नुकसान, पशुधनाची हानी आदी सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने होणे आवश्यक आहे. यासोबतच ज्या गावांमध्ये, घरांमध्ये पुराचे पाणी गेले आहे, अशा ठिकाणी साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी आरोग्य विभागाने विशेष खबरदारी घ्यावी. आवश्यक ठिकाणी औषधी कीटचे वाटप करावे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित होवू नयेत, यासाठी खबरदारी घ्यावी. ज्याठिकाणी असे स्त्रोत दुषित झाले असतील, तिथे पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केलेल्या नागरिकांसाठी आरोग्य, भोजन आदी सुविधा चोखपणे पुरवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या. पुराच्या पाण्यामुळे चारा वाहून गेलेल्या ठिकाणी पशुपालकांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पावसाचे व पुराचे प्रमाण कमी झालेल्या ठिकाणी नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत. अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष फिल्डवर जावून नुकसानीचे पंचनामे करणे आवश्यक आहे. यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत, नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहू नये, याबाबत खबरदारी घ्यावी. तसेच ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीची मदत लवकरात लवकर वितरीत होण्यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार स्तरावर मिशन मोडवर कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात राबविण्यात आलेल्या शोध मोहिमा, नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण आदी कार्यावाहीचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis