रत्नागिरी, 28 सप्टेंबर, (हिं. स.) : कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्प जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी वैशिष्ट्यपूर्ण अमूल्य वारसा ठेवा जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि निसर्गयात्री संस्था यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला.
संयुक्त राष्ट्र पर्यटन संस्थेने दिलेल्या पर्यटन आणि शाश्वत विकास या घोषवाक्याला अधीन राहून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हा करार झाला. जागतिक पर्यटन दिनाचा औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत प्रधान कार्यालय व संलग्नित सर्व प्रादेशिक कार्यालय, पर्यटक निवास येथे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्य मंत्री पर्यटन इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन संचालनालयाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटने यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन महाव्यवस्थापक एमटीडीसी चंद्रशेखर जयस्वाल यांनी केले होते.
युनेस्को जागतिक वारसा स्थळ दर्जा मिळण्याच्या प्रक्रियेत समाविष्ट असलेली कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पे. भवितव्यात कोकण पर्यटन क्षेत्रात आणि त्याअनुषंगाने सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटने यांनी रत्नागिरीतील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्राला भेट दिली. तसेच त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गणपतीपुळे येथे आयोजित कार्यक्रमात निसर्गयात्री संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच कोकणातील कातळशिल्प शोधकर्ते व अभ्यासक सुधीर रिसबूड आणि एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक माने या दोघांच्या स्वाक्षरीने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
याप्रसंगी गणपतीपुळे येथील एमटीडीसी रिसॉर्टचे व्यवस्थापक वैभव पाटील, गणपतीपुळे येथील पर्यटन व्यावसायिक श्री. केळकर, श्री. काळोखे व अन्य मंडळी तसेच निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड, ऋत्विज आपटे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी