- ठाकरे गटाच्या विरोधामुळे घेतला निर्णय
मुंबई, 28 सप्टेंबर (हिं.स.)। आशिया कप 2025 चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज, रविवारी दुबईत खेळवण्यात आला. महिन्याभरातली ही तिसरी वेळ असून, याआधी झालेल्या साखळी आणि सुपर-4 फेरीत टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केले आहे. त्यामुळे अंतिम सामन्यातही भारताच्या विजयाची उत्सुकता देशभर वाढली. मात्र, या सामन्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मोठे वादळ उठले.
पीव्हीआर आयनॉक्सने भारत-पाकिस्तान अंतिम सामन्याचे स्क्रिनिंग करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून यासंदर्भातली माहिती देताच संतापाची लाट उसळली. विशेषतः, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या सामन्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असताना, महाराष्ट्रात अशा कार्यक्रमाला परवानगी का दिली जाते? असा सवाल उपस्थित करण्यात आला.
शिवसेना (ठाकरे गट) संचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांनी या निर्णयाला थेट विरोध दर्शवला. त्यांनी दुपारी पीव्हीआर आयनॉक्सच्या प्रशासनाशी भेट घेऊन या संदर्भात जाब विचारला. चित्रे म्हणाले, “भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध होत असताना महाराष्ट्रात हा सामना का दाखवला जातो आहे? आम्ही यापूर्वीही एका इंटरटेनमेंट कंपनीला अशा प्रकारे जाब विचारला होता, पण त्यांनी आमचं ऐकलं नव्हतं. आता पीव्हीआर तीच चूक करत आहे. याचे परिणाम भोगावे लागतील.”
ते पुढे म्हणाले, “शिवसैनिक जेव्हा पेटून उठतात, तेव्हा ते काय करू शकतात हे सर्वांना ठाऊक आहे. आज आम्ही ते दाखवून दिलं आहे.” ठाकरे गटाच्या या इशाऱ्यानंतर काही तासांतच पीव्हीआरने आपला निर्णय मागे घेतला. अखिल चित्रे यांनी स्वतः या निर्णयाची माहिती दिली.
यानंतर पीव्हीआर प्रशासनाने भारत-पाकिस्तान अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग महाराष्ट्रात न करण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला. त्यामुळे वादाला तात्पुरता पूर्णविराम लागला असून, राज्यातील पीव्हीआर थिएटरमध्ये प्रेक्षकांना हा सामना पाहता येणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule