रत्नागिरी, 28 सप्टेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष, खरेदी-विक्री संघाचे संचालक, तसेच गुहागर मेडिकल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिल जोशी (७०) यांचे शनिवारी (२७ सप्टेंबर) रात्री निधन झाले. त्यांच्यावर आज त्यांच्या मूळगावी (ता. गुहागर) नरवण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
नरवणसारख्या दुर्गम भागात सुसज्ज रुग्णालय उभारणारे, नारळ आणि आंबा बागायतदार आणि प्रयोगशील शेतकरी म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांनी नारळ विकासासाठी संपूर्ण जिल्ह्यात कार्यरत असलेले अनेक उपक्रम राबवले. रोटरी क्लब ऑफ गुहागरचे २००७ मधील अध्यक्षपद भूषवताना आरोग्य शिबिर, मोफत जयपूर फूट वाटप, रक्तगट तपासणी, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा व व्याख्यानमाला असे अनेक उपक्रम राबवले.
नारळ उत्पादकांसाठी गट स्थापना, प्रशिक्षण वर्ग, संशोधकांचे मार्गदर्शन, औषधे व खतांचा पुरवठा, तसेच प्रक्रियायुक्त उद्योगांच्या माध्यमातून तालुकास्तरावर रोजगार निर्मितीसाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. गावातील रस्ते, वीज, आणि ग्रंथालय उभारणीसारख्या विकासकामांमध्येही त्यांचा पुढाकार होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी