रत्नागिरी, 28 सप्टेंबर, (हिं. स.) : रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे याने इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत केलेल्या जोरदार कामगिरीचे कौतुक रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत अविराज गावडेने जबरदस्त कामगिरी करताना शेवटच्या सामन्यात नाबाद शतकी खेळी केली होती. या स्पर्धेत त्याने सहावेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला. तसेच मिडलसेक्स कंट्री लीगचा बेस्ट बॉलर हा पुरस्कारसुद्धा मिळवला. इंग्लंडमधील कौंटी स्पर्धा आटोपून मायदेशी परतलेल्या अविराज गावडेचे रत्नागिरीत जोरदार स्वागत झाले.
आज अविराज गावडे याने रत्नागिरीचे पालकमंत्री श्री. सामंत यांची भेट घेतली. यावेळी श्री. सामंत यांनी अविराज गावडे याचे अभिनंदन केले. अविराज गावडे या टॅलेंटेड युवा क्रिकेटपटूच्या पाठीशी आपण सदैव उभे राहू, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील क्रिकेटमध्ये अविराज गावडेचा सहभाग होण्यासाठी आपले प्रयत्न राहतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, बाबू म्हाप आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी