रायगड, 28 सप्टेंबर (हिं.स.)।
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर म्हसळा शहरातील श्रीराम सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या महिला विभागातर्फे महिला महाआरती व कुंकूमार्चन कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. तब्बल तीनशेहून अधिक महिलांनी सहभागी होऊन या धार्मिक विधीला भक्तिभावाने साजरे केले. सलग तिसऱ्या वर्षी आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे म्हसळा तालुक्याच्या सांस्कृतिक परंपरेत महिलांचे योगदान अधोरेखित झाले आहे.
श्रीराम मंडळ हे म्हसळ्यातील नावाजलेले मंडळ असून महिला महाआरती व कुंकूमार्चनचे नियोजन गेल्या तीन वर्षांपासून महिला सदस्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. कार्यक्रमाचे वेळापत्रक आखणे, निमंत्रण पत्रिका वाटप, आरतीचे नियोजन, प्रसाद वितरण, सूत्रसंचालन आदी सर्व जबाबदाऱ्या महिला गटांकडून पार पाडल्या जातात. यावर्षी कुमारी मनाली समीर करडे हिने तबला वादन करून महाआरतीत विशेष रंगत आणली. तर रात्री लकी ड्रॉ, लहान मुलांना भेटवस्तू वाटप आणि गरबा यांसारखे कार्यक्रम भरवून उत्सव अधिक रंगतदार करण्यात आला.
महेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक कुंकूमार्चन विधी पार पडला. नवरात्रातील घटस्थापना, कुमारिका पूजन आणि सौभाग्यवती पूजनाप्रमाणेच कुंकूमार्चन या विधीलाही देवीपूजेतील महत्त्वाचे स्थान आहे. देवीच्या कृपेसाठी आणि सौभाग्यवृद्धीसाठी हा विधी विशेष मानला जातो.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्पिता करडे, अनिषा करडे, गौरी पोतदार, भाविका पोतदार, वनिता समेळ, स्नेहल निजामपुरकर, संपदा पोतदार, निमिषा ओक, प्राजक्ता करडे, संगिता करडे, पूजा पानसरे, मानसी बनकर, सिद्धी हेगिष्ट्ये, धनश्री फाटक यांसह अनेक महिलांनी विशेष परिश्रम घेतले.
धार्मिक विधीच्या पलीकडे जाऊन हा उपक्रम महिलांच्या संघटनशक्ती, नियोजनकौशल्य, स्वावलंबन आणि नेतृत्वगुणांचे दर्शन घडवणारा ठरला. “नवरात्रोत्सव केवळ पूजा-अर्चनेपुरता मर्यादित न राहता महिलांना एकत्र आणून आत्मविश्वास वाढवणारा सण ठरावा,” असा प्रेरणादायी संदेश या महाआरती व कुंकूमार्चनातून देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके