दसऱ्याला भारताचे पहिले वन्यजीव नाटक 'संगीत बिबत आख्यान' चिपळूणमध्ये
रत्नागिरी, 28 सप्टेंबर, (हिं. स.) : भारताच्या नाट्यपरंपरेत मैलाचा दगड ठरलेले, देशातील पहिले वन्यजीव नाटक म्हणून लौकिक मिळवलेले ''संगीत बिबत आख्यान'' हे धमाल विनोदी नाटक येत्या २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक कें
बिबट नाटक


रत्नागिरी, 28 सप्टेंबर, (हिं. स.) : भारताच्या नाट्यपरंपरेत मैलाचा दगड ठरलेले, देशातील पहिले वन्यजीव नाटक म्हणून लौकिक मिळवलेले 'संगीत बिबत आख्यान' हे धमाल विनोदी नाटक येत्या २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सादर होणार आहे.

निसर्ग आणि मानवी सहजीवनाचा एक अदृश्य अध्याय उलगडणारे हे नाटक विचारप्रवर्तक अनुभव देईल. 'संगीत बिबत आख्यान' हे केवळ एक नाटक नाही, तर ते वन्यजीवनाचे एक जिवंत चित्रण आहे. हे नाटक विशेषतः भारतीय जंगलातील सर्वाधिक देखण्या आणि गूढ प्राण्यांपैकी एक असलेल्या बिबट्याच्या जीवनावर आधारित आहे. बिबट्याचे अधिवास, पिलांचे संगोपन, आणि मानवी वस्तीच्या वाढत्या प्रभावामुळे त्याच्या अस्तित्वाला निर्माण होणारे धोके हे सर्व नाट्यमय पद्धतीने यात गुंफले आहे. हे नाटक बिबट्या आणि मानव यांच्यातील शतकानुशतके चाललेला संघर्ष आणि सहजीवनाचा गुंतागुंतीचा धागा अतिशय संवेदनशीलपणे उलगडते.

या नाटकाची निर्मिती वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी समाजात गहन जनजागृती निर्माण करण्यासाठी करण्यात आली आहे. भारत विविध प्रकारच्या वन्यजीवांनी समृद्ध देश आहे, परंतु वाढत्या शहरीकरणामुळे आणि नैसर्गिक अधिवासांच्या ऱ्हासामुळे अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत. 'संगीत बिबत आख्यान' या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना या गंभीर वास्तवाकडे लक्ष वेधून, निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक जबाबदारीने जपण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या नाट्यप्रयोगाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे संगीत आणि कलाकारांचा कसदार अभिनय. नाटकातील प्रत्येक पात्र, मग ते मानवी असो किंवा वन्यजीव, अत्यंत प्रभावीपणे साकारले आहे. पारंपरिक आणि आधुनिक संगीताचा सुरेख संगम या नाटकाला एक वेगळीच उंची प्रदान करतो. प्रेक्षकांना बिबट्याच्या दृष्टिकोनातून जगाची अनुभूती देणारा हा प्रयोग आहे. यानिमित्ताने भारतात पहिल्यांदाच बिबट्यावर रचलेली भारुडे, बिबट्याची लावणी, कव्वाली, निसर्गाची नांदी, भैरवी, वन्यजीवांवर आधारित शाहिरी गाणी यांसारख्या अनमोल खजिना आपल्यासमोर उलगडून ठेवला जाईल.

चिपळूणमधील या प्रयोगाच्या निमित्ताने स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत. ते वन्यजीव संरक्षणाच्या गरजा आणि भविष्यातील आव्हाने यावर आपले विचार मांडतील. हा प्रयोग शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. नाटकात चिपळूण आणि रत्नागिरीच्या बऱ्याच नट आणि गायकांचा समावेश आहे.

नाटकाचा आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. या प्रयोगासाठी प्रवेश विनामूल्य आहे. या नाटकाचे आयोजन रत्नागिरी वन विभागाने केले असून कार्यक्रमाचे नियोजन चिपळूण वन परिक्षेत्र अधिकारी सरवर खान आणि त्यांचे कर्मचारी करत आहेत. त्यांना विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरीजा देसाई, सहाय्यक वन संरक्षक श्रीमती प्रियांका लगड यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande