नाशिक, 3 सप्टेंबर (हिं.स.)।
- नाशिक महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेसाठीच्या हरकतींसाठी गुरुवारपर्यंत (दि. ४) मुदत असल्याने काल, मंगळवारी एकाच दिवसात २६ हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे एकूण हरकतींची संख्या ५३ पर्यंत पोहोचली आहे. सोमवारपर्यंत २७ हरकती प्राप्त झाल्या होत्या. नाशिक महानगरपालिकेची प्रारूप प्रभागरचना २२ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. प्रभागरचनेचे नकाशे २३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपासून महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनाच्या सूचना फलकावर, तसेच आऑनलाइन संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते.
या प्रभागरचनेवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. २६ ऑगस्टला प्रभाग ११ व ३१ बाबत दोन हरकती दाखल झाल्या. त्यानंतर २८ ऑगस्ट रोजी सर्वाधिक १३ हरकती दाखल झाल्या. त्यापाठोपाठ २९ ऑगस्ट रोजी ७ हरकती, तर सोमवारी, दि. १ सप्टेंबर रोजी पाच हरकती दाखल झाल्या आहेत. प्राप्त हरकतींमध्ये प्रभाग २२ व ३१ बाबत सर्वाधिक ९ तक्रारी आहेत. या दोन्ही प्रभागांमध्ये पिंपळगाव खांबचा परिसर विभागला गेल्याने वाद निर्माण झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV