
अपघातात चौघांचा मृत्यू, तिघे अजूनही बेपत्ता
बलरामपूर, 03 सप्टेंबर (हिं.स.) : छत्तीसगडच्या बलरामपूर जिल्ह्यातील विश्रामनगर परिसरातील धनेशपूर गावात एक बांध फुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन घरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली असून, 7 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. विशेष म्हणजे या 7 पैकी 6 जण एकाच कुटुंबातील आहेत.
पोलिसांनी घटनास्थळी शोधमोहीम राबवत 4 मृतदेह हस्तगत केले आहेत. यात सासू-सून आणि एका बालकाचा समावेश आहे. दोन लहान मुले आणि एक गावकरी अद्याप बेपत्ता आहेत. कनहर नदीच्या प्रवाहात हे मृतदेह वाहून गेल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या धरणाची
उभारणी 1980-81 साली झाली होती. हे धरण 2 डोंगरांमध्ये वसलेले असून, दहा-बारा वर्षांपूर्वी धरणातून गळती सुरू झाली होती. त्यावेळी काही प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, यंदाच्या मुसळधार पावसामुळे जलाशय पूर्ण क्षमतेने भरले होते आणि पाण्याच्या दबावामुळे मंगळवारी रात्री धरण फुटले.
या दुर्घटनेत रामवृक्ष नावाच्या व्यक्तीचे घर पूर्णतः वाहून गेले. ते गुरे आणण्यासाठी गेले असताना घरात त्यांची पत्नी, दोन सुना आणि तीन नातवंडे होते. तसेच काही जनावरे देखील पुरात वाहून गेल्याचे समजते. बांध फुटल्याची माहिती मिळताच पोलीस, आपत्ती निवारण पथक आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाचे अधिकारी आणि गावकरी मिळून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत आहेत.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी