
नाशिक, 3 सप्टेंबर (हिं.स.)गणेशोत्सवात नंदीनी नदीकिनारी निकामी जिलेटीनचा साठा आढळून आलेला असतांनाच दोनच दिवसात वाडीव-हे पोलीसांनी सारूळ येथील एका घरावर छापा मारून जिलेटीनने भरलेल्या सहा हजार कांड्यांचे ४९ बॉक्स, २२०० किलो ज्वालाग्राही डिटोनेटर्स व घातक वायरींचा बेकायदेशीर साठा जप्त केला आहे. स्फोट घडविण्यासाठी त्या घातक पदार्थांचा वापर केला जात असल्याचे माहिती असूनही निष्काळजीपणाने हा साठा दडवून ठेवल्याने पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आहे. या साठ्यावरून सांरूळ, राजूर बहुला परिसरात बेकायदेशीरपणे खाणकाम, खडीक्रेशर सुरू असल्याच्या तक्रारींना पृष्टी मिळाली आहे.
मथुरे सध्या गणेशोत्सव सुरू असून, उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी यंत्रणेला खबरदारीच्या सूचना दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार सारूळ शिवारातील घरामध्ये बेकायदेशीर जिलेटीन, डिटोनेटर्सचा साठा दडवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरिक्षक भगवान मधूरे व सहाय्यक पोलीस निरिक्षक दिनकर मुंडे यांच्या पथकाने बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकाच्या मदतीने छापा मारला. एका घरामध्ये तसेच पत्र्याच्या शेडमध्ये अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या जिलेटीनसारखे स्फोटक पदार्थांच्या कांडया भरलेले ४९ बॉक्स आणि २२०० डेटोनेटर एकत्रितरित्या ठेवलेले आढळून आले. पोलिसांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या मदतीने हा साठा ताब्यात घेतला आहे. अधिक तपास वाडीव-हेचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे करीत आहेत.
याप्रकरणी गोरख बाजीराव ढगे (३४), विकास नवले, ओंकार कैलास नवले (२३), गौरव मोहन नवले (३२) सर्व रा. सारूळ, ता. नाशिक, दीपक दशरथ क्षीरसागर (३२) रा. शिंगवे बाहूला, देवळाली कॅम्प, अमित अजमेरा, कोठावदे यांना पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV