लातूरमध्ये चार सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी हद्दपार
लातूर, 24 जून (हिं.स.) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने लातूर पोलिसांनी मोठी प्रतिबंधक कारवाई करत चार सराईत गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार केले आह
पोलीस कारवाई


लातूर, 24 जून (हिं.स.) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने लातूर पोलिसांनी मोठी प्रतिबंधक कारवाई करत चार सराईत गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी रोहिणी नरहे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (१)(ब) अन्वये हे आदेश पारित केले आहेत.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या नेतृत्वात शहरातील सराईत गुन्हेगार, दहशत निर्माण करणाऱ्या तसेच वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत गांधी चौक पोलीस ठाणे व लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामार्फत हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.

सदर प्रस्तावांची सखोल चौकशी केल्यानंतर संबंधित आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे तसेच पूर्वी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अहवाल, गोपनीय साक्षीदारांचे जबाब, गुन्ह्यांची वारंवारिता आणि सार्वजनिक शांततेवर होणारा परिणाम यांचा विचार करून ही कारवाई करण्यात आली.

हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये महादेव दिलीप सन्मुखराव (रा. राजीव नगर, बाभळगाव चौक, लातूर) व महेश ताजू कांबळे (रा. आनंदनगर, लातूर) यांचा समावेश असून त्यांना लातूर जिल्हा, धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव व कळंब तालुका तसेच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुका येथून हद्दपार करण्यात आले आहे.

तसेच रेहान अरिफ उर्फ अरेफ कुरेशी (रा. भोई गल्ली, कुरेशी मोहल्ला, लातूर) व पृथ्वीराज उर्फ अण्णा भास्कर माने (रा. मंठाळे नगर, लातूर) यांना लातूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

आदेशानुसार संबंधितांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असून आदेश मिळाल्यानंतर २४ तासांच्या आत निर्धारित क्षेत्र सोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच हद्दपारीच्या कालावधीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय संबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड, उपनिरीक्षक गणेश चित्ते, प्रमोद देशमुख तसेच पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, संतोष गिरी, रवीसन जाधव, आर. बी. गवारे, सचिन चंद्रपाटले, शिवा भाडुळे आणि गोविंद राऊत यांनी सहभाग घेतला.

लातूर पोलिसांकडून अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande