
जळगाव, 24 जून (हिं.स.) | जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जळगाव तोलकाटा परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) एटीएममध्ये चोरट्यांनी धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पोलिसांची चाहूल लागताच चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकारात कॅश व्हॉल्टमधील ११०० रुपयांच्या नोटा जळाल्याची नोंद झाली असून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
जळगावच्या संभाजीनगर महामार्गावरील सुप्रीम कॉलनीतील प्लॉट क्रमांक २३ मध्ये, जळगाव तोलकाटा शेजारी स्टेट बँकेचे एटीएम आहे. मंगळवारी पहाटे ४ वाजून ३२ मिनिटांच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या ‘सेल्टॉस’ कारमधून तोंडाला रुमाल बांधलेले दोन चोरटे तेथे आले. त्यांनी एटीएम रूममध्ये छोटे गॅस सिलिंडर आणि ऑक्सिजन सिलिंडर नेले व गॅस कटरच्या साहाय्याने एटीएमचा कॅश ट्रे कापण्याचा प्रयत्न सुरू केला. एटीएम मशीनशी छेडखानी होत असतानाच, चेन्नई येथील मुख्य कार्यालयाला (अलर्ट सिस्टीमद्वारे) याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच, नुकतीच नाईट ड्युटी संपवून घरी पोहोचलेले हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट घटनास्थळ गाठले. पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. चोरटे घाईघाईत आपले गॅस सिलिंडर आणि इतर साहित्य एटीएम रूममध्येच सोडून पसार झाले. कॅश ट्रे मधील ५०० रुपयांच्या २ व शंभर रुपयांची १ अशा ३ नोटा जळाल्या आहे.
विशेष म्हणजे, याच एटीएममध्ये तीन महिन्यांपूर्वीदेखील चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे या एटीएमवर चोरट्यांची पुन्हा नजर असल्याचे दिसून येत आहे. या स्टेट बँकेच्या एटीएमची देखभाल व दुरुस्ती ‘हिताची पेमेंट प्रा. लि.’ (चेन्नई) या कंपनीकडे आहे. घटनेची माहिती मिळताच कंपनीचे नाशिक येथील प्रतिनिधी वाल्मीक पाटील हे जळगावात दाखल झाले. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि कारच्या नंबरच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर