पुणे, 4 सप्टेंबर (हिं.स.)।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता आविष्कार या आंतरविद्यापीठ स्तरीय संशोधन स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी मार्गदर्शन शिबिरे आणि कार्यशाळा १३ सप्टेंबरपर्यंत घेण्यात याव्यात. महाविद्यालय, परिसंस्था आणि विद्यापीठ विभागस्तर संशोधन स्पर्धा २० सप्टेंबरपर्यंत घेण्यात यावी, अशी सूचना विद्यापीठाने केली आहे.
विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढावी, संशोधनाला चालना मिळावी, यासाठी आविष्कार आंतरविद्यापीठस्तरीय संशोधन स्पर्धा घेण्यात येतात. स्पर्धेसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी डॉ. देविदास वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
विद्यापीठाने दिलेल्या सूचनेप्रमाणे संलग्न महाविद्यालये, परिसंस्था आणि विद्यापीठाच्या विभागांना आविष्कार मार्गदर्शन शिबिर, कार्यशाळा आणि संशोधन स्पर्धा आयोजित केल्याचा अहवाल २७ सप्टेंबरपर्यंत द्यायचा आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्था आणि विद्यापीठ विभाग प्रमुखांनी प्रत्येकी एका अनुभवी प्राध्यापकास संशोधन समन्वयक म्हणून नेमणूक करून स्पर्धेची नोंदणी करायची आहे. पहिल्या टप्प्यात स्पर्धेतून प्रत्येक महाविद्यालयांनी प्रत्येक स्तर आणि शाखेतून प्रत्येकी तीन प्रकल्पांची निवड करायची आहे. विषयतज्ज्ञांकडून संकल्पनांचे परीक्षण करून पहिल्या टप्प्यात प्रस्तावांची निवड करण्यात येईल. विद्यापीठाच्या वतीने विभागीय स्तरावरील आविष्कार स्पर्धांचे आयोजन ऑक्टोबर २०२५मध्ये करण्याचे प्रस्तावित आहे.
या प्रक्रियेतून पुढे येणाऱ्या अतिउच्च गुणवत्ताधारक प्रकल्पांना विद्यापीठातील रिसर्च ॲण्ड इनोव्हेशन पार्क, इनक्युबेशन सेंटर या उद्योजक विकास योजना तसेच अस्पायर यांसारख्या संशोधन प्रोत्साहन योजनांशी जोडून स्टार्ट-अप तसेच बौद्धिक संपदा हक्कात रूपांतरण करण्याची प्रक्रिया करण्यात येईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. विनायक जोशी यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु