परभणी, 4 सप्टेंबर (हिं.स.)।
पूर्णा शहरात मागील काही दिवसांपासून मोकाट श्वान व गाढवांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या समस्येवर तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे आज (४ सप्टेंबर) निवेदनाद्वारे करण्यात आली.
सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून मुख्य बाजारपेठेत मोकाट श्वान व गाढव धावत सुटल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः महिला, लहान मुले व वृद्ध नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. श्वानांची संख्या अनियंत्रित वाढल्यामुळे त्यांच्यात रेबीजचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेबीज झालेल्या श्वानांनी नागरिकांना किंवा दुभत्या जनावरांना चावा घेतल्यास प्राणघातक परिणाम होऊ शकतो.
निवेदनात सर्व श्वानांचे रेबीज लसीकरण व नसबंदी करण्याची तसेच गाढवांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने प्रतिसाद मिळावा म्हणून नगरपालिकेने रेबीज झालेल्या श्वानांना पकडण्यासाठी विशेष हेल्पलाइन क्रमांक सुरू करावा, अशी मागणीही निवेदनात नमूद आहे.
या निवेदनावर मोहन गुंजकर, अॅड. राजवर्धन जोंधळे, कोंडीबा कदम, गौतम मुळे, रवींद्र कदम, योगेश सोनुले, मुंजा कदम, अमित जोगदंड, अब्दुल जुबेर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis