रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याकरीता उपाययोजना करा – अधीक्षक अभियंता
पुणे, 4 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व संबंधित विभागाने प्रयत्न करावेत. अपघातग्रस्त भागांचा (ब्लॅकस्पॉट) सविस्तर अभ्यास करून योग्य उपाययोजना राबविण्यावर भर द्यावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभाग
kkff


पुणे, 4 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व संबंधित विभागाने प्रयत्न करावेत. अपघातग्रस्त भागांचा (ब्लॅकस्पॉट) सविस्तर अभ्यास करून योग्य उपाययोजना राबविण्यावर भर द्यावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मान्यतेने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, अनुराधा भंडारे, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पिंपरी-चिंचवडचे संदेश चव्हाण, बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील अपघातांचा आढावा देताना श्री. बाविस्कर यांनी सांगितले की, वार्षिक ९०० पेक्षा अधिक मृत्यू होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे जास्त अपघाती भागांचा सर्वेक्षण करून उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी २३ जून २०२५ रोजीच्या बैठकीत दिलेल्या सुचनेनुसार प्रादेशिक परिवहन विभागाने ब्लॅकस्पॉटचे सर्वेक्षण करुन उपाययोजना सुचविल्या असून त्यानुसार संबंधित विभागांनी कार्यवाही करावी. हिंजेवाडी आणि चाकण परिसरातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस व परिवहन विभागाने विशेष उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी नमूद केले.

वाहनधारकांना वाहन खरेदीवेळी हेल्मेट उपलब्ध करून देण्यासाठी वाहन विक्रेत्यांसोबत बैठक घेऊन त्यांना सूचना द्याव्यात, असेही निर्देश श्री. बाविस्कर यांनी दिले. रस्ते सुरक्षा सुधारणा आणि अपघातांची नोंद करण्यासाठी केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने तयार केलेल्या एकात्मिक रस्ते अपघात डेटाबेस (आयआरएडी) मध्ये वस्तुनिष्ठ माहिती भरावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात येत्या जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

बैठकीत श्रीमती अर्चना गायकवाड, श्री. संदेश चव्हाण व श्री. सुरेंद्र निकम यांनी ब्लॅकस्पॉट सर्वेक्षण व उपाययोजनांची माहिती दिली. तर श्री. संजय कदम यांनी महामार्गावरील उपाययोजनांचा आढावा सादर केला. सेव्ह लाईफ फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी बारामती शहरात २७ जुलै रोजी झालेल्या अपघाताचे निरीक्षण व त्याअनुषंगाने आवश्यक उपाययोजना यावर सादरीकरण केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande