सोलापूर, 4 सप्टेंबर (हिं.स.)। होटगी रोड विमानतळावर नाईट लॅंडिगची सोय नसल्याने गोव्याला जाणाऱ्या विमानसेवेसाठी सायंकाळची वेळ गैरसोयीची ठरू लागली आहे. यामुळे सोलापूर- गोवा मार्गावरील विमानसेवेच्या वेळेत लवकरच बदल होण्याची शक्यता आहे. याबरोबरच उडाण योजनेचा लाभ घेण्यासाठी भविष्यात मोपा विमानतळाऐवजी दाबोळी विमानतळाचा वापर करण्याचा फ्लाय-९१ कंपनीचा विचार आहे. रविवारी सायंकाळी ५.१० मिनिटाने गोव्यातून सोलापूरला येणारे विमान पावसामुळे दृश्यमानता कमी असल्याने सायंकाळी ६.१५ मिनिटाने म्हणजे एक तास उशिराने आले, तर परतीच्या प्रवासासाठी उड्डाणाची नियमित वेळ सायंकाळी ५.३५ मिनिटांची असताना सायंकाळी ६.५५ मिनिटांनी ते गोव्याकडे झेपावले. पाऊस व हिवाळ्यात धुक्यांमुळे वारंवार अशा घटना घडू शकतात. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन येणाऱ्या या विमानाला वेगवेगळ्या ठिकाणांच्या हवामानानुसार वेळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हिवाळ्यात लवकर सूर्यास्त होत असल्याने व सोलापूरला नाइट लॅंडिगची सोय नसल्याने सायंकाळच्या वेळेत लवकरच बदल करण्याचा विचार कंपनी करत आहे. लवकरच सोलापूर विमानतळावरून स्टार एअरलाइन्सची मुंबई- सोलापूर- बंगळूर अशी विमानसेवा सुरू होणार आहे. दोन्ही कंपन्यांच्या समन्वयातून नवीन वेळापत्रक जाहीर होऊ शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड