नाशिक, 4 सप्टेंबर (हिं.स.)फूटसाल असोसिएशन ऑफ नाशिक यांच्या वतीने आणि ढिकले फाउंडेशन आणि अस्मिता दर्शन मंडळ यांच्या सहकार्याने नाशिकच्या पंचवटी येथील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथील इनडोअर हॉलमध्ये नाशिक जिल्हा फुटसाल अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला मोठया उत्साहात सुुरवात झाली.
या स्पर्धेत १२ वर्षे मुले, १४ वर्षे मुले आणि १५ वर्षे मुली अश्या तीन वयोगतांचा समावेश आहे. यामध्ये १२ वर्षे गटात ११ संघ, १४ वर्षे गटात १४ संघ तर १५ वर्षे मुलींच्या गटात ०९ संघ अश्या ३४ संघांनी सहभाग घेवून चांगला प्रतिसाद दिला. या संघांमध्ये रायन क्लब, यु. डी स्पोर्टस्, सेंट लॉरेन्स, ॲचिव्हर्स अकॅडीमी, गुरु एफ. सी. , केडन्स क्लब, सनराईस क्लब, अँजेल क्लब, आत्मा मलिक स्कूल, आर्या फाउंडेशन यांचा सामावेश आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक नरेंद्र छाजेड यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी लाख मराठा प्रतिष्ठान, नाशिकचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर, क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य राजेश क्षत्रीय,शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक अशोक दुधारे, राजू शिंदे, अशोक कदम, योगेश नाटकर, जिल्हा सचिव दीपक निकम, अध्यक्ष दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश वाघ यांनी केले.
उदघाटनानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. साखळी आणि नंतर बाद पद्दतीने खेळविल्या जात आहेत. यामध्ये चार गटांत विभागणी केलेल्या १४ वर्ष मुलांच्या गटात रायन क्लब, डॉन ब्रेकर्स, गुरु एफ. सी., आर्या फाउंडेशन, सेंट लॉरेन्स, पी. एम. ए. आणि आत्मा मलिक स्कूल यांनी आपले गटवार साखळी सामने जिंकून चांगली सुूरवात केली. उद्या सकाळपर्यंत साखळी सामने खेळविले जातील. त्यानंतर दुपारी उपांत्य सामने आणि अंतिम सामने पार पडतील अशी माहिती आयोजकांनी दिली.या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची नाशिक जिल्हा सांघामध्ये निवड करण्यात येणार आहे. हे निवड झालेले खेळाडू १२ ते १५ सप्टेंबर, २०२५ दरम्यान नाशिक येथेच आयोजीत राज्य स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधत्व करतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV