- वय व कुटुंबातील लाभार्थ्यांच्या संख्येनुसार लाभ तात्पुरता थांबवला
रायगड, 4 सप्टेंबर (हिं.स.)। 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या काही महिला लाभार्थ्यांचे लाभ राज्यस्तरीय छाननीनंतर तात्पुरते थांबविण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित महिलांनी आपल्या पात्रतेची पडताळणी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत रुक्मिणी ज्ञानोबा हावळे यांनी केले आहे.
कोणत्या लाभार्थ्यांचा लाभ थांबवण्यात आला?
राज्यस्तरावर झालेल्या छाननीनंतर काही प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांची पात्रता संदेहास्पद आढळली आहे. विशेषतः आधारकार्डनुसार वय 21 वर्षांपेक्षा कमी किंवा 65 वर्षांपेक्षा जास्त असलेल्या महिलांचा समावेश. राशनकार्डनुसार ज्या कुटुंबात दोनपेक्षा अधिक महिलांना लाभ मिळत आहे, अशा कुटुंबातील महिलांचा समावेश. पडताळणी सुरु; संबंधित प्रकरणांची महिला व बालविकास विभागामार्फत सध्या पडताळणी सुरु असून, पात्रता सिद्ध झाल्यानंतर अशा लाभार्थ्यांचा योजनेचा लाभ पुन्हा सुरु केला जाणार आहे. त्यामुळे, ज्यांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे, त्यांनी आपले कागदपत्र व माहिती आपल्या गावातील अंगणवाडी सेविकेकडे त्वरित सादर करावी.
अधिकाऱ्यांचे आवाहन; या प्रक्रियेस सहकार्य करण्याचे आणि गैरसमज टाळण्याचे आवाहन करताना हावळे म्हणाले की, “हे केवळ पडताळणीसाठीचे पाऊल आहे. पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारे वंचित ठेवले जाणार नाही. सर्व महिलांनी आवश्यक त्या माहितीची पूर्तता लवकरात लवकर करावी.”
लाडकी बहिण योजना म्हणजे काय? राज्य शासनाच्या या योजनेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण मानली जाते.
लाभार्थींना विनंती करण्यात आली आहे कि, आपल्याला योजनेचा लाभ मिळत नसल्यास, किंवा तो थांबवलेला असल्यास तत्काळ आपल्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sandesh Salunke