सोलापूर, 4 सप्टेंबर (हिं.स.)। माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या करमाळा विभागाच्या पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील फोन संभाषण व व्हिडीओ कॉल प्रकरण सध्या प्रसार माध्यमात जोरदार चर्चेत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कुर्डू गावात रस्त्यासाठी सुरू असलेल्या मुरूम उत्खननाच्या तक्रारीनंतर पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या. यावेळी स्थानिक ग्रामस्थांसोबत त्यांची शाब्दिक चकमक झाली. या दरम्यान बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून कृष्णा यांच्या हातात दिला. फोनवरून पवारांनी स्वतःची ओळख करून देत कारवाई थांबविण्याचे आदेश दिले. मात्र, अंजली कृष्णा यांनी त्यांचा आवाज ओळखला नाही. त्यावर पवारांनी नाराजी व्यक्त करत 'मैं डीसीएम अजित पवार बोल रहा हु. कारवाई बंद करो, मेरा आदेश है' असे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड