मुंबई, 7 सप्टेंबर (हिं.स.)। भारतीय क्रिकेटला अनेक ऐतिहासिक क्षण देणारा ‘कॅप्टन कुल’ एमएस धोनी आता मैदानावरून थेट रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. रविवारी बॉलिवूड अभिनेता आर माधवनने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत वासन बाला यांचा ‘द चेस’ चा टीझर प्रदर्शित केला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी आणि माधवन दोघेही टास्क फोर्स अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसत आहेत. गणवेश परिधान करून गोळ्या झाडतानाचे, धमाकेदार ॲक्शन सीन दाखवलेले दृश्य प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
धोनीला मैदानाबाहेर अशा अवतारात पाहणे चाहत्यांसाठी मोठा सरप्राईज ठरला आहे. माधवनने टीझर शेअर करत लिहिले, “एक मिशन. दोन लढाऊ. बकल अप – एक जंगली, स्फोटक पाठलाग सुरू होतो.” मात्र, हा प्रकल्प चित्रपट आहे की वेब सिरीज की आणखी काही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आणि चर्चांना उधाण आले आहे.
धोनीने याआधी अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे तसेच तमिळ चित्रपट ‘द गोट’ मध्ये विशेष उपस्थितीही दर्शवली होती. मात्र, माधवनसोबत पूर्ण भूमिकेत त्याला पाहणे ही प्रेक्षकांसाठी नवी आणि रोमांचक अनुभूती असणार आहे. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तो झपाट्याने व्हायरल झाला असून युजर्सकडून प्रश्नांचा भडिमार सुरू झाला आहे.
१५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही धोनी आयपीएलमध्ये अद्याप सक्रिय आहे. तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत असून, २०२६ च्या आयपीएलमध्येही धोनी मैदानावर उतरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता मात्र ‘कॅप्टन कुल’चा हा ॲक्शन अवतार चाहत्यांना किती भुरळ घालतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule