- मनोज वाजपेयीसोबत भाऊ कदम, ओंकार राऊत यांची दमदार साथ
मुंबई, 7 सप्टेंबर (हिं.स.)। प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मनोज वाजपेयी यांचा बहुप्रतिक्षित ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा चित्रपट नुकताच ५ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून सध्या प्रेक्षकांमध्ये त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आणि आता रिलीज झाल्यानंतरही प्रेक्षक त्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. या चित्रपटाची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणावर मराठी कलाकारांचा समावेश असून हीच बाब महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अधिक आकर्षित करत आहे.
या चित्रपटात भाऊ कदम, सचिन खेडेकर, गिरीजा ओक, ओंकार राऊत, हरीश दुधाडे, भरत सावले, वैभव मांगले आणि नितीन भजन यांसारखे मराठीतील नामवंत कलाकार झळकत आहेत. सर्वांनी आपापल्या भूमिकेतून प्रभावी कामगिरी केली असून विशेषतः भाऊ कदम यांनी पोलिस अधिकाऱ्याची साधी पण ताकदीची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याचप्रमाणे ओंकार राऊत आणि हरीश दुधाडे यांनी गंभीर पात्रासोबत हलकेफुलके विनोदी पैलू देखील उत्तम प्रकारे साकारले आहेत.
चित्रपटाचं दिग्दर्शनही मराठमोळ्या चिन्मय मांडलेकर यांनी केलं असून त्यामुळे या चित्रपटाला आणखी एक वेगळा आयाम प्राप्त झाला आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या कथेचा मध्यबिंदू म्हणजे मनोज वाजपेयी यांनी साकारलेला ‘इन्स्पेक्टर झेंडे’. हुशार, चलाख आणि विनोदी शैलीत काम करणाऱ्या या अधिकाऱ्याला एका कुख्यात गुन्हेगाराचा सामना करावा लागतो. ‘कार्ल भोजराज’ या गुन्हेगाराच्या व्यक्तिरेखेवरून थेट चार्ल्स शोभराजची आठवण येते. गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील पाठलाग, त्यातील रोमांच आणि थरारक घडामोडी प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.
मनोज वाजपेयींच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट अधिक खुलून आला आहे. त्यांनी साकारलेलं पात्र प्रामाणिकपणा, शौर्य आणि विनोदबुद्धी या सर्व गुणांनी सजलेलं आहे. स्वतः मनोज यांनीही या भूमिकेबद्दल बोलताना सांगितलं की, “झेंडे हे केवळ प्रसिद्धीसाठी नव्हते लढत, तर आपलं कर्तव्य पार पाडत होते. त्यांची शैली, त्यांचं शौर्य आणि मुंबईचं वेगळं वैशिष्ट्य मला खूप आवडलं. मला वाटलं की ही भूमिका साकारताना मी जणू एखाद्या पुस्तकातील पात्राला भेटलो.”
हलकी-फुलकी मांडणी असूनही कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. म्हणूनच या चित्रपटाचा अनुभव नेटफ्लिक्सवर प्रेक्षक मोठ्या आनंदाने घेत आहेत. रिलीजच्या काही दिवसांतच ‘इन्स्पेक्टर झेंडे’ने केवळ मनोज वाजपेयींच्या अभिनयामुळे नाही तर मराठमोळ्या कलाकारांच्या दमदार उपस्थितीमुळेही चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule